वस्त्र निर्यात 100 अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवा - पीयूष गोयल

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

वस्त्र निर्यात 100 अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवा - पीयूष गोयल

नवी दिल्लीवस्त्र निर्यात सध्याच्या 33 अब्ज डॉलर्स निर्यात मूल्यापासून 100 अब्ज डॉलर पर्यंत तिपटीने वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले पाहिजे. ते म्हणाले की, हस्तकलेसह वस्त्र आणि परिधानांच्या 2021-22 मधील 44 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचे लक्ष्य गाठण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे संकल्प केला पाहिजे.वस्त्रोद्योग क्षेत्र मागील सर्व विक्रमांना मागे टाकेल अशी अपेक्षा केंद्रीय वस्त्रोद्योग ग्राहक व्यवहार मंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केली. ते भारतातील वस्त्रोद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधताना बोलत होते.
मंत्री म्हणाले की, निर्यातदारांसाठीच्या प्रोत्साहनपर अनुदानाच्या जुन्या थकबाकीचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने त्यांचे वस्त्रोद्योग मंत्रालय वित्त मंत्रालयासोबत काम करत आहे. उद्योगांच्या सर्व गरजा विचारात घेण्यासाठी सरकारने चर्चेची दारे कायमच खुली ठेवली आहेत.असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, जे उद्योग अनुदानावर अवलंबून नाहीत त्या उद्योगांची अधिक भरभराट होते.
श्री गोयल पुढे म्हणाले की, वस्त्रोद्योग आणि मित्रा (MITRA)पार्क योजनांसाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहनपर अनुदान योजना मंजुरीसाठी प्रगतीपथावर आहे. भारतीय वस्त्रोद्योगाची आणि शतकानुशतके पारंपरिक ज्ञान, हस्तकला आणि तंत्रांचा वापर शाश्वत कापड निर्मितीसाठी करणाऱ्या आपल्या विणकरांची गाथा, कलात्मकतेची आणि गुंतागुंतीच्या कामाची पातळी अतुलनीय आहे, असे ते म्हणाले. आमचे कापड निर्यातदार नसते तर जगाने बरीच उत्पादने कधीच अनुभवली नसती.
वस्त्र निर्यात लवकरात लवकर सध्याच्या 33 अब्ज डॉलर्सच्या निर्यात मूल्यापेक्षा 3 पटीने वाढवण्याची आणि देशांतर्गत उत्पादन 250 अब्ज डॉलर्स पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे, त्यादृष्टीने कार्यवाह करण्याचे आवाहन श्री गोयल यांनी उद्योगांना केले.श्री गोयल म्हणाले की, निर्यातदारांनी त्यांचे प्रयत्न, नैपुण्य आणि कार्यक्षमतेने देशाच्या अपेक्षांना पाठबळ दिले पाहिजे.त्यांनी नवीन बाजारपेठांचा शोध घेतला पाहिजे आणि बाजारपेठां संदर्भातील माहिती /मागणी इतरांना सांगितली पाहिजे.
यावेळी बोलताना वस्त्रोद्योग आणि रेल्वे राज्यमंत्री श्रीमती. दर्शना जरदोश यांनी सांगितले की, भारतीय वस्त्र आणि परिधान उद्योगांनी त्यांची कार्यक्षमता वाढवली पाहिजे.वस्त्रोद्योग क्षेत्र स्त्रियांना सक्षम करते कारण बहुतेक स्त्रिया या क्षेत्रात कार्यरत असून उपजीविकेसाठी या माध्यमातून कमाई मिळवत आहेत, असंही त्यांनी सांगितले. उत्पादनाला चालना देण्यासाठी आणि निर्यात वाढवण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी आयोजित संवादात नामवंत वस्त्र निर्यातदार आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनी सहभाग घेतला.