वैयक्तिक स्वार्थ नव्हे देश सर्वोच्च- डॉ. मोहन भागवत
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
जम्मू,: आमची संस्कृती, परंपरा यापासूनच देश निर्माण झालाय. त्यामुळे क्षुद्र वैयक्तीक स्वार्थाहून देशहित सर्वोच्च असल्याचे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. जम्मू विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला संघाचे सहसरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल, उत्तर क्षेत्र संघचालक सीताराम व्यास, राष्ट्रीय मुस्लीम मंचचे इंद्रेशकुमार आणि जम्मू-काश्मीरचे सह संघचालक डॉ. गौतम मॅंगी उपस्थित होते.
यावेळी सरसंघचालक म्हणाले की, जम्मू-काश्मिरातून अनुच्छेद 370 हटवल्यानंतर इथली व्यवस्था बदलली आहे. या दिवसासाठी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी आणि प्रजा परिषदेने आंदोलन केले होते. काश्मिरातून 370 हटवल्याजाणे ही डॉ. मुखर्जींसह अनेक देशभक्तांची स्वप्नपूर्ती आहे. परंतु, फक्त व्यवस्था बदलून उपयोग होणार नाही. तर त्यासोबतच लोकांची मानसिकतेत देखील परिवर्तन घडवून आणणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सरसंघचालकांनी केले. माणसांचे वैयक्तिक स्वार्थ अतिशय मर्यादित स्वरुपाचे आणि छोटे-छोटे असतात. परंतु, देशाचा स्वार्थ किंवा हित याचा विचार केला असता त्यात समाज, संस्कृती आणि परंपरांचा समावेश होतो. त्यामुळे देशाचे हित, सुरक्षा याला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज आहे. त्यासाठी आमचे सामाजिक वर्तन कसे असावे ही विचार करण्याजोगी गोष्ट आहे. आमच्या वर्तनातूनच देश सक्षम आणि सुरक्षित बनेल असे डॉ. भागवत यांनी सांगितले. भारताला महाशक्ती बनण्याची गरज नाही. तर संपूर्ण जगाने आमचे अनुकरण करावे असे आमचे वर्तन हवे. भारतीय संस्कृती अनादी काळापासून जगाच्या कल्याणाची कामना करीत असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक प्रकारचे वैविध्य असूनही भारत आणि इथला समाज एकसंघ आहे. आयुष्यातील सुखाची व्याख्या करणारा धर्म आमच्याकडे आहे. आमचा धर्म संपूर्ण जगाला आपुलकीच्या भावनेतून बघणारा आणि सुख देणारा आहे. सरसंघचालक म्हणाले की, समाज म्हणजे माणसांची गर्दी नसून प्रत्येक मनुष्याचे जीवन विशिष्ट हेतूने प्रेरित असते. समाजातील प्रत्येकाच्या समोरील उद्दिष्ट एकसमान असणे आवश्यक असल्याचे भागवत यांनी स्पष्ट केले.