आपण निसर्गाचे मालक नसून विश्वस्त आहोत - भूपेंद्र यादव
For Printing Download Epaper from files section from bottom of this page

नवी दिल्ली,: गांधी जयंतीनिमित्त आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाच्या विशेष आठवड्याची (4 ते 10 ऑक्टोबर 2021) घोषणा करण्यानिमित्ताने केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज ‘इंडिया फॉर टायगर्स – अ रॅली ऑन व्हील्स’ अभियानाला हिरवा झेंडा दाखविला, पर्यावरणसंबंधी पर्यटनासाठीच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या तसेच सिंधू आणि गंगा या नद्यांतील डॉल्फिनच्या मोजणीसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या.
केंद्रीय मंत्री यादव म्हणाले की ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव - विशेष आठवडा’ कालावधीत आणि नंतर देखील नागरिकांच्या सहभागावर लक्ष केंद्रित करणारे आणि नंतर ‘जनआंदोलना’त परिवर्तीत होणाऱ्या सखोल, देशव्यापी अभियानाची संकल्पना ठेवण्यात आली आहे. या जनआंदोलनात स्थानिक पातळीवरील लहानलहान बदल, महत्त्वाच्या राष्ट्रीय लाभांमध्ये रुपांतरीत होतील आणि निसर्गाशी सुसंवाद राखत, निसर्गाच्या विश्वस्ताची संकल्पना पुन्हा अमलात आणण्यात मदत होईल.
या प्रसंगी, केंद्रीय मंत्र्यांनी महाराष्ट्रातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प, कर्नाटकातील बिलीगिरी रंगनाथ मंदिर व्याघ्र प्रकल्प आणि मध्य प्रदेशातील डूबरी व्याघ्र प्रकल्प अशा तीन व्याघ्र प्रकल्पांतून व्याघ्र रॅलीला हिरवा झेंडा दाखविला.
संपूर्ण भारतभर सुरु असणाऱ्या या उपक्रमाची दोन उद्दिष्टे आहेत, एक म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीची 75 वर्षे पूर्ण होत असल्याचा उत्सव साजरा करणे आणि दुसरे म्हणजे केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाच्या व्याघ्र प्रकल्प आणि वन्यजीव अधिवासांचा एकात्मिक विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत जैवविविधतेचे संवर्धन करण्यासंबंधी संदेश प्रसारित करणे. ‘रॅली ऑन व्हील्स’ विविक्षित तारखांना आणि ठराविक मार्गांवरून आयोजित केली जाईल आणि क्षेत्र संचालक त्यांचे नेतृत्व करतील. 1973 सालच्या व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत देशात रणथंबोर, कान्हा, मेळघाट, बांदीपूर, सीमीलीपाल, सुंदरबन, मानस, पालामाऊ आणि कॉर्बेट या सर्वात प्रथम स्थापन करण्यात आलेल्या नऊ व्याघ्र प्रकल्पांमध्ये या रॅलीजची सांगता होणार आहे. देशातील सर्व 51 व्याघ्र प्रकल्प या उपक्रमात स्थानीय पातळीवरून सहभागी होणार आहेत.
या कार्यक्रमात अरण्ये आणि वन्यजीवव्याप्त प्रदेश यांतील पर्यावरणसंबंधी पर्यटनाबाबतच्या मार्गदर्शक सूचना देखील जारी करण्यात आल्या. संपर्ण जगभरात तसेच भारतात देखील पर्यावरणसंबंधी पर्यटन प्रचलित आहे. केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने ‘अरण्ये आणि वन्यजीवव्याप्त प्रदेश यांतील शाश्वत पर्यावरणसंबंधी पर्यटनाबाबतच्या मार्गदर्शक सूचना’ जरी केल्या आहेत. जंगले, वन्यजीवव्याप्त प्रदेश आणि पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील प्रदेश यांच्यातील पर्यावरणसंबंधी पर्यटनाला या सूचना लागू आहेत.
वन्यजीव आणि त्यांच्या अधिवासाच्या संवर्धनासाठी सहभागी दृष्टीकोनाची गरज लक्षात ठेऊन या मार्गदर्शक सूचना स्थानिक समुदायांना ‘आत्म निर्भर’ होण्यासाठी उपयुक्त ठरतील अशा पद्धतीने पर्यटनाच्या क्षेत्रात या समुदायांना सामावून घेण्यावर भर देतात आणि पर्यावरणविषयक पर्यटनातील सर्व भागधारकांमधील भागीदारीला प्रोत्साहन देतात तसेच या पर्यटनातून मिळणाऱ्या लाभांचे स्थानिक समुदायांसोबत न्याय्य पद्धतीने वाटप होण्याचा आग्रह धरतात. प्रत्येक संरक्षित क्षेत्रात पायाभूत गोष्टींची निर्मिती आणि महसुलाची स्थानिक समुदायांसोबत वाटणी करून घेण्याला या सूचनांमध्ये अधोरेखित करण्यात आले आहे.
केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी गंगा आणि सिंधू या नद्यांमधील डॉल्फिन, त्यांच्याशी संबंधित जलचर आणि त्यांचे अधिवास यांचा निरीक्षण अभ्यास करण्यासाठीचे क्षेत्र मार्गदर्शक पुस्तक देखील जारी केले. डॉल्फिन ही संरक्षक प्रजाती आहे आणि या प्रजातीच्या संवर्धनातून मनुष्यप्राण्यासह संबंधित अधिवास आणि जैवविविधता यांचे कल्याण साधता येते. संवर्धन आवश्यक असलेली महत्त्वाची क्षेत्रे निश्चित करण्यासाठी डॉल्फिन्सची गणना होणे महत्त्वाचे ठरते कारण त्यातून संवर्धन क्षेत्रांमध्ये योग्य उपाययोजनांसह विकासाचे नियोजन आणि स्थानिक समुदायांच्या उपजीविकेचे मार्ग सुरक्षित करण्यासाठी कार्य हाती घेता येईल. आपल्याकडे प्रथमच डॉल्फिन्ससाठी प्रमाणित निरीक्षण नियमावली तयार करण्यात आली आहे.