लसीकरणाआधी तरुणाईची रक्तदानाला पसंती
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
कल्याण : 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे देखील लसीकरण सुरु झाल्याने हि लस घेण्याआधी तरुणाई रक्तदान करण्याला पसंती देत असल्याचे चित्र कल्याण डोंबिवलीमध्ये पाहायला मिळत आहे. कोरोना योद्धाची जवाबदारी अखंडित पणे पार पडणाऱ्या डोंबिवली मेडिकल केमिस्ट असोसिएशनच्या एफडीए, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात 111 रक्तबाटल्या संकलित करण्यात आल्या.
डोंबिवली येथील रोटरी भवन येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले. या शिबिरात महिलांसह तरुणांची उपस्थिती उल्लेखनीय होती. अन्न व औषध प्रशासनचे सहा. आयुक्त प्रवीण मुंधडा यांच्या हस्ते शिबिराचा शुभारंभ करण्यात आला तर समारोप प्रसंगी जगन्नाथ शिंदे यांनी उपस्थिती दिली. आजच्या परिस्थितीत ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यांचे नाव केमिस्ट संघटनेच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल. जीवनाची लाईफ स्टाईल एकप्रकारच्या जैविक युद्धामुळे बदलली आहे. आपण योग आणि ब्रह्मविद्याला आपलेसे करून घेतल्यास कोणतीही व्याधी आपल्याला जखडणार नाही असे मत त्यांनी यावेळी मांडले.
आजच्या परिस्थितीत रक्ताची नितांत गरज होती असे कॅम्प प्रत्येक शहरात होणे गरजेचे आहे. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ ही उक्ती सफल करण्यात डोंबिवली केमिस्टने दिलेले योगदान वाखाणण्याजोगे असल्याचे मत अन्न व औषध प्रशासन चे सहा. आयुक्त प्रवीण मुंधडा यांनी व्यक्त केले.
तर सध्या 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरु झाले असून लस घेतल्या नंतर काही महिने रक्तदान करता येणार नसल्याने आम्ही रक्तदान करत असल्याची प्रतिक्रिया रजनीश दळवी, आशिष बिरवाडकर, कुणाल म्हात्रे, सुशांत थोरात, नीरज भोईर, अनिकेत बिरवाडकर, निशिकांत गडहिरे, हर्षल भुणभुणे, नितीन नामये, संदेश कांबळे या तरुण रक्तदात्यांनी दिली. शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रकल्प प्रमुख निलेश वाणी, अध्यक्ष दिलीप देशमुख, सचिव विलास शिरुडे, खजिनदार राजेश कोरपे यांनी परिश्रम घेतले.