18 ते 44 वयोगटातील लोकांना ऑनलाइन नोंदणी आवश्यक नाही, आता सरकारी लसीकरण केंद्रावर सुद्धा लसीकरणाची सोय
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली : लसीकरणाच्या मोहिमेत सरकारने नागरिकांच्या सुविधेसाठी आणखी एक बदल जाहीर केला आहे. त्यानुसार, 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांना लसीकरणासाठी ऑनलाइन रेजिस्ट्रेशन आवश्यक नाही. नवीन नियमानुसार ते आता सरकारी लसीकरण केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष रेजिस्ट्रेशन करून बुकिंग करू शकतील. ही सुविधा सध्या केवळ सरकारी लसीकरण केंद्रांवर असणार असे सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारने सर्वच राज्यांना ही माहिती दिली आहे. या सुविधेने नागरिक आणि लसीकरणासाठी ऑन साइट अर्थात लसीकरण केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष लसीकरणाची बुकिंग आणि लस दोन्ही एकदाच करू शकतील. पण, महाराष्ट्रात सध्या लसींच्या कमतरतेमुळे 18 ते 44 वर्षे वयोगटातील लसीकरण अनेक ठिकाणी बंद आहे.
केंद्र सरकारने का घेतला निर्णय?
अनेक राज्यांना लसीकरणासाठी व्हॅक्सीनचे स्लॉट मिळाले तरीही त्या व्हॅक्सीन केंद्रांपर्यंत पोहोचलेल्या नव्हत्या. अशात व्हॅक्सीन खराब होण्याची प्रकरणे वाढत आहेत. विविध वृत्तांचा दाखला देत केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. यासोबतच, ग्रामीण भागांमध्ये ऑनलाइन नोंदणीला अडचणी येत असल्याचे सुद्धा केंद्राने म्हटले आहे.
कंपन्यांना लस विकत घेऊन कर्मचाऱ्यांना देण्याची मुभा
तत्पूर्वी केंद्र सरकारने शनिवारी एक निर्णय जारी करून कामाच्या ठिकाणीच लसीकरण करण्यास मंजुरी दिली. यात सरकारी आणि खासगी अशा दोन्ही प्रकारच्या कार्यालये, कंपन्या आणि आस्थापनांमध्ये ही सुविधा घेता येईल. केवळ कर्मचारीच नव्हे, तर त्यांचे कुटुंबीय सुद्धा यात लस घेऊ शकतील. विशेष म्हणजे, अशा स्वरुपाच्या लसीकरणासाठी कंपन्या रुग्णालयांमधून किंवा थेट निर्मात्यांकडून लस खरेदी करू शकतील. यामुळे लसीकरणाला चालना मिळेल असे सरकारने म्हटले आहे.
महाराष्ट्रात जूनपासून 24 तास लसीकरण?
देशभर 1 मे पासून 18 ते 44 वर्षे वयाच्या व्यक्तींच्या मोफत लसीकरणाला सुरुवात झाली. परंतु, महाराष्ट्रासह इतर काही राज्यांमध्ये लसींच्या अपुऱ्या पुरवठ्याचे कारण देऊन ते पुढे ढकलण्यात आले. दरम्यानच्या काळात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी 18 ते 44 वयोगटात दोन भाग करून लस देण्याचा विचार मांडला होता. परंतु, तो सुद्धा बारगळला. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 1 जूनपासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना राज्यात 24 तास लसीकरण करणार असल्याचे आश्वस्त केले आहे. देशात सर्वाधिक लसीकरण महाराष्ट्रातच झाले असून लवकरच राज्य 2 कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडणार असल्याचे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी रविवारी सांगितले आहे.