भारताची भरारी
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
ऑलिंपिक स्पर्धा आता निम्म्यावर आली आहे. पण भारताची कामगिरी बर्यापैकी सुरू आहे. कोविडच्या आव्हानाला सामोरे जाणार्या आणि दुखापतींनी ग्रस्त असलेल्या भारतीय ऑलिंपिक पटुंनी केलेली कामगिरी पहाता ही तर भारताची भरारी आहे, असेच म्हणावे लागेल. कोविड सर्वच देशांमध्ये होता. त्यामुळे भारताचेच विशेष काय कौतुक, असे वाटेल. परंतु ऑलिंपिकमध्ये भाग घेणार्या इतर बर्याच देशांमध्ये साधनसंपत्तीची कमतरता नाहि. भारताच्या बाबतीत साधनसंपत्तीची कमतरता आणि कौशल्याचे प्रदर्शन करण्याच्या संधीचा अभाव, चांगल्या प्रशिक्षकाचीं टंचाई अशी इतर अनेक कारणे असतात. त्यासर्वांवर मात करून भारतीय खेळाडू खरेतर महिलांनी ऑलिंपिकमध्ये भारताची मान उंचावली आहे. पुरूषांपेक्षा ऑलिंपिकमध्ये भारताच्या महिलाच जास्त चमकतात आणि त्यातून भारताच्या स्त्री शक्तिचे दर्शन घडत असते. वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक प्राप्त करणारी मीराबाई चानु आणि आता बॅडमिंटनमध्ये कांस्य पदक प्राप्त करणारी पी व्ही सिंधु यांनी भारताच्या नारीशक्तिचे जोरदार प्रदर्शन केले आहे. त्यांच्या यशामुळे सारे जग अचंबित झाले आहे. याचे कारण इतरही देशाच्या महिलांनी पदके मिळवली आहेत. बर्याच जणींनी तर सुवर्णपदके जिंकली आहेत. परंतु त्यांना अनुकूल अशी स्थिती असते. भारतात तर अगोदर पुरूष खेळांडुंनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. आर्थिक अडचणी तर असतातच. परंतु इतरही अनेक असतात. पुरूषांना ही अनेक संकटांशी सामना करून लढावे लागते तर महिलांच्या बाबतीत तर ही प्रतिकूल परिस्थिती किती तरी प्रमाणात वाढते. त्यातून मीराबाई चानू आणि सिंधु यांच्या यशाचे मोल कशातच करता येणार नाहि. सिंधु तर अनेक दुखापतींनी त्रस्त होती. त्यात तिने प्रशिक्षक पुलेला गोपीचंदला रजा देऊन कोरियाचे प्रशिक्षक पार्क ताई सांग यांच्याकडून धडे घेण्यास सुरूवात केली होती. त्यात रजत पदक हुकल्याने ती अत्यंत निराश झाली होती. या सर्व विपरित परिस्थितीवर मात करून ती एका निश्चयाने मैदानात उतरली आणि प्रतिस्पर्धी हे बिंग जिआओ हिला २१-१३,२१-१५ असे सरळ सेट्समध्ये हरवले. सिंधु इतकी आक्रमक होती की तिला पूर्ण एक तासही बिंगला हरवण्यासाठी लागला नाहि. अत्यंत शक्तिशाली सर्व्हिस ही तिची ताकद आहे आणि त्याबाबतीत कांस्यपदकासाठीच्या सामन्यात बिंगकडे काहीच उत्तर नव्हते. रौप्य पदकासाठी झालेल्या सामन्यात झालेल्या पराभवाने सिंधु चांगलीच खवळली होती आणि त्याचे चटके बिंगला सहन करावे लागले. सिंधुच्या यशाने भारत भारावला असतानाच भारतीय महिला हॉकी संघ चक्क उपांत्य फेरीत पोहचला असल्याचे वृत्त आले आणि अख्खा भारत आनंदाने थरारून गेला. भारतीय महिला संघाने आतापर्यंत एकदाही उपांत्य फेरीत प्रवेश केला नव्हता. त्यामुळे भारतासाठी याहून चांगली बातमी असू शकत नव्हती. भारतीय पुरूष हॉकी संघाने सुवर्णपदक सत्तरीच्य दशकात जिंकल्यानंतर हॉकीमध्ये भारताची कामगिरी तितकीशी चांगली होत नव्हती. त्यामुळे भारतीय महिला हॉकी संघाची भरारी ही रोमांचक निश्चितच आहे. सुवर्णपदकापासून हा संघ फक्त दोन पावले दूर आहे. खरेतर या संघाकडून कुणालाच अपेक्षा नव्हत्या. हा संघ जागतिक क्रमवारीत बाराव्या स्थानी आहे. परंतु जेव्हा अपेक्षा नसतात तेव्हा दडपणही नसते. त्यात एखादा कमी प्रतिचा मानला गेलेला संघही असामान्य कामगिरी करून जातो. भारतीय महिला हॉकी संघाच्या बाबतीत याचे प्रत्यंतर येत आहे. सिंधु असो की महिला हॉकी संघ, यांनी भारतीय खेळातील चित्रच पालटून टाकले आहे. क्रिकेटचे अमर्याद वेड असलेल्या भारतात इतर खेळाडुंना अशी प्रसिद्धी आणि चाहत्यांचे प्रेम मिळत असलेले पाहून नवी आशा निर्माण झाली आहे. सिंधु ही तर सलग दोन ऑलिंपिकमध्ये पदके मिळवणारी पहिली महिला बॅडमिंटनपटु ठरली आहे. तर पुरूषांमध्ये हा विक्रम सुशीलकुमारने कुस्तीत केला आहे. परंतु दुर्दैवाने तो सध्या तुरूंगात आहे. हे दोन खेळाडू सोडले तर असा पराक्रम कुणालाही करता आलेला नाहि. क्रिकेटपेक्षा भारतात आता इतरही खेळांबाबतीत आवड वाढली आहे, हे एक आशादायक चिन्ह आहे. सिंधु आणि मीराबाईच्या यशाने त्यावर कळस चढवला आहे. भारतीय तरूण खेळाडू आता क्रिकेट एके क्रिकेट न करत बसता इतर खेळांकडे वळत आहेत. त्याचवेळेस लव्हलिना बोरगोहेनकडे लक्ष ठेवले पाहिजे. तीही पदकांच्या स्पर्धेत आहे. लव्हलिना आसामची आहे तर मीराबाई मणिपूरची आहे. यावरून असे दिसते की ईशान्येच्या राज्यात क्रिडा कौशल्याची खाण आहे. देशाला सुवर्णपदके मिळवून देण्याची त्यांच्यात क्षमता आहे. फक्त त्यांना प्रशिक्षण आणि साधनसंपत्तीची कमतरता आहे. ती दिली तर त्यांच्यातून भारतासाठी पदके मिळवण्याची क्षमता असलेले खेळाडू तयार होतील. पदके जिंकून देणारे खेळाडू केवळ मोठ्या शहरांतील नसतात. तर ग्रामीण भागातही बुद्धिमत्ता आणि कौशल्य ठासून भरलेले खेळाडू असतात. हेच मीराबाई आणि बोरगोहेनच्या यशाने दिसले आहे. सरकारने या खेळाडूंवर आता विशेष लक्ष दिले पाहिजे. तेथे क्रिडाविकास झाला तर ते अंतिमतः भारताच्या फायद्याचे आहे.