माझे सहकारी म्हणून तुम्ही हे नक्की समजून घ्याल; राज यांचं कार्यकर्त्यांना आवाहन
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
देशात आणि राज्यात करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला, तरी त्याचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. ही परिस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. १४ जून रोजी राज ठाकरे यांचा वाढदिवस असून, अशा वाढदिवस साजरा करणं माझ्या मनाला पटत नाही, अशी भावना राज यांनी व्यक्त केली आहे. वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर राज यांनी महाराष्ट्र सैनिकांना एक पत्र लिहिलं आहे. राज्यातील करोना परिस्थिती जाणीव करून देत राज यांनी कुणीही भेटायला येऊ नये, घरीच राहून काळजी घ्यावी, असं कळकळीचं आवाहन केलं आहे.
राज ठाकरे काय म्हणाले? पत्र जसंच्या तसं…
दरवर्षी माझ्या वाढदिवसाला आपण भेटतो. तुम्ही फार प्रेमाने अनेक ठिकाणाहून येता. मलाही तुम्हाला भेटल्यावर आनंद होतो आणि अंगात नवा उत्साह संचारतो, उर्जा मिळते. तशी उर्जा जाहीर सभेतही मिळते. पण तिथे तुम्ही नुसते दिसता, भेटत नाही. म्हणून माझ्या दृष्टीने वाढदिवसाचा दिवस तुमच्या सहवासात, तुम्हाला भेटल्याने खरा साजरा होतो. तुमच्या भेटीची मी वाट पाहात असतो. मात्र हेही वर्ष बिकट आहे. मागच्या वर्षीसारखंच. अजूनही करोनाने महाराष्ट्राला घातलेला विळखा सोडलेला नाही. लॉकडाउन उठतो आहे. हळूहळू सगळं पूर्वपदावर यायला लागलं आहे. परंतु परिस्थिती अजूनही गंभीरच आहे. आजचंच पाहा, महाराष्ट्रात एका दिवसात काल १२,२०७ नवे रुग्ण सापडले आणि १,६४,७४३ जण आताही उपचार घेत आहेत. अशा वातावरणात वाढदिवस वगैरे साजरा करणे मनाला पटत नाही. माझे सहकारी म्हणून तुम्ही हे नक्की समजून घ्याल.
हे वातावरणच असं आहे की आपण सावध असलं पाहिजे. खबरदारी घेतली पाहिजे. प्रवास करणं, मोठ्या प्रमाणात गर्दी करणं, गाठी भेटी अशा गोष्टी करणं अजूनही टाळल्या पाहिजेत. म्हणून मी तुम्हाला अत्यंत मन:पूर्वक आणि आग्रहाची विनंती करेन की माझ्या भेटीसाठी घरी येऊ नका. तुमच्या घरीच राहा, जिथे आहात, तिथे सुरक्षित राहा. आपल्या कुटुंबियांची, आसपासच्या परिसरातल्या लोकांची काळजी घ्या. तुम्ही प्रेमाने याल आणि आपली भेट होणार नाही असं नको व्हायला. तुम्ही सर्वांनी या करोना काळात जागरुकपणे चांगलं काम केलंत, ज्याचा मला फार अभिमान आहे. अशाच कामात राहा, अजूनही आपली माणसं दु:खात आहेत. कुणाची घरची माणसं गेली, त्यात आपल्या पक्षातलेही कितीतरी जण दुर्दैवाने आपल्याला सोडून गेलं. तसंच कुणाचे रोजगार गेले, त्या सर्वांना धीर द्या, त्यांच्यासाठी आता करता आहात तसंच काम करत राहा. आजवर राखलंत तसंच परिस्थितीचं भान राखा.