मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांच्या पॉझिटिव्हीटी रेटमध्ये मोठी घट; निर्बंध होणार शिथिल?
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : करोनाची दुसरी लाट आता ओसरू लागल्याचं चित्र आहे. दिवसागणिक राज्यातील नवीन करोनाबाधितांची संख्या कमी होत असून, सरकारने एप्रिलमध्ये लागू केलेले निर्बंधही काही प्रमाणात शिथिल केले आहेत. तर काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध पूर्णपणे हटवले आहेत. दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी होताना दिसत असली, तरी तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सरकारने राज्यातील निर्बंध हटवण्यासंदर्भात आणि दुसऱ्या लाटेत निर्माण झालेली अभूतपूर्व परिस्थितीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पंचस्तरीय पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे. यानुसार निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात जिल्ह्यांचं पाच गटात वर्गीकरण केलं जात असून, प्रत्येक आठवड्याला निकषानुसार यादी जाहीर केली जात आहे. पुढील आठवड्यातील निर्बंध शिथिल करण्यासंदर्भातील जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
राज्य सरकारने निर्बंध हटवण्यासंदर्भात पाच गट तयार केलेले आहेत. पॉझिटिव्हीटी रेट आणि उपलब्ध ऑक्सिजन बेडची संख्या यानुसार या जिल्ह्यांचं वर्गीकरण केलं जातं. सरकारने काढलेल्या आदेशाप्रमाणे सर्वात कमी पॉझिटिव्हीटी रेट म्हणजेच ५ टक्क्यांच्या आत पॉझिटिव्हीटी रेट असणाऱ्या जिल्ह्यांतील निर्बंध पूर्णपणे हटवण्यास परवानगी आहे. तर सर्वात जास्त पॉझिटिव्हीटी रेट असणाऱ्या जिल्ह्यातील निर्बंध वाढवण्याचे निर्देश दिलेले आहेत.