भारतात तिसरी लाट तुलनेत सौम्य!
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली : देशात ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर दरम्यान करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असून त्यात दुसऱ्या लाटेपेक्षा बाधितांची दैनंदिन संख्या निम्मी असेल, शिवाय कोविड प्रतिबंधक वर्तनाने प्रसंगी ही लाट टाळलीही जाऊ शकते, असे मत सरकारी गटातील वैज्ञानिकांनी प्रारूपाच्या आधारे म्हटले आहे.
कोविड संसर्ग तिसऱ्या लाटेत वेगाने पसरू शकतो कारण सार्स सीओव्ही २ म्हणजे करोना विषाणूचा अधिक प्रसार करणारा विषाणू येऊ शकतो, असे मत सूत्र प्रारूपाचे मुख्य गणिती मणिंद्र अग्रवाल यांनी म्हटले आहेत. त्यांनी गणितीय प्रारूपाच्या आधारे आतापर्यंत करोना लाटांच्या स्वरूपाची मांडणी केली आहे.
विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने करोनाच्या वाढत्या रुग्णांचा वेध घेण्यासाठी गणितीय प्रारूप तयार करण्यासाठी एक पथक स्थापन केले होते. अग्रवाल यांच्याशिवाय या गटात हैदराबाद आयआयटीचे एम. विद्यासागर, संरक्षण विभागाच्या वैद्यकीय उपसंचालक (वैद्यकीय) माधुरी कानिटकर यांचा समावेश आहे. या गटाने कोविड १९ विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा अंदाज योग्य प्रकारे सांगितला नाही, त्याबाबत अलिकडेच टीका झाली होती.
तिसऱ्या लाटेबाबत अग्रवाल यांनी म्हटले आहे की, आशावादी चित्र पाहिले तर ऑगस्टपर्यंत सर्व जीवन सुरळीत होईल आणि नवीन विषाणू प्रकार येणार नाही. दुसरे मध्यम चित्र पाहिले तर लसीकरण समजा वीस टक्के कमी प्रभावी ठरले तर वेगळे चित्र असेल. निराशावादी तिसरे चित्र पाहिले तर २५ टक्के जास्त प्रसार करणारा नवीन विषाणू ऑगस्टमध्ये येईल. तो डेल्टा प्लस नसेल. अग्रवाल यांच्या मते दुसरी लाट ऑगस्ट मध्यावर संपुष्टात येईल. ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान तिसरी लाट येईल. तिसऱ्या लाटेत दैनंदिन दीड ते दोन लाख रुग्ण सापडतील. ही संख्या दुसऱ्या लाटेच्या निम्मीच असेल. कारण दुसऱ्या लाटेत शिखरावस्थेत ७ मे रोजी भारतात एकाच दिवशी ४ लाख १४ हजार १८८ रुग्ण सापडले होते. उत्परिवर्तित विषाणू आला तर तिसरी लाट वेगाने पसरेल. पण तरी दैनंदिन रुग्ण संख्या दुसऱ्या लाटेच्या निम्मीच राहील. डेल्टा विषाणू उपप्रकाराच्या तुलनेत ती कमी असेल. लसीकरण वाढत गेले तर तिसऱ्या व चौथ्या लाटेची शक्यता कमी राहील. आणखी आशावादी चित्र पाहिले तर दैनंदिन रुग्ण संख्या पन्नास हजार ते १ लाख राहील.
विद्यासागर यांच्या मते तिसऱ्या लाटेत लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज कमी भासेल. ब्रिटनमध्ये जानेवारीत साठ हजार रुग्ण होते, तर दैनंदिन मृत्यू १२०० होते. चौथ्या लाटेत २१ हजार रुग्ण होते, १४ मृत्यू झाले. लसीकरणामुळे मृतांची व रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या कमी झाली.