बेघर, आधार कार्ड नसलेल्यांनाही लस देणार; महापौरांनी दिली महत्त्वाची माहिती
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : मुंबईतील करोना परिस्थिती काही प्रमाणात सुधारत असल्याचं चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णसंख्या घटत असून, करोना प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न केले जात आहे. महापालिकेकडून केल्या जात असलेल्या उपाययोजनांची महापौर किशोरी पेडणेकर यांनी माहिती दिली. “फेरीवाल्यांची नोंदणी झाली आहे. फेरीवाल्यांचे झोन तयार करताना ती नोंदणी केलेली आहे. त्यामुळे जी मदतीची घोषणा केलीये, ती पूर्ण केली जाईल,” अशी माहितीही पेडणेकर यांनी दिली.
मुंबईतील करोना परिस्थिीतबद्दल महापौर किशोर पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. महापौर पेडणेकर म्हणाल्या, “महापालिका लहान मुलांसाठी वार्ड तयार करण्यासाठी जागा शोधत आहे. लहान मुलांसाठी पाळणाघर तयार करण्याचाही प्रयत्न आहे. दिव्यागांसाठी घरात ठेवणं घातक ठरू शकतं. त्यामुळे या सगळ्यांचा विचार केला जात आहे. जागांचा शोध सुरू आहे. त्याप्रमाणे कारवाई केली जाईल,” असं पेडणेकर म्हणाल्या.
“४५ वर्षापुढील व्यक्ती आणि पहिल्या फळीतील कोविड योद्धे थेट लसीकरण केंद्रात जाऊन लसीचा दुसरा डोस घेऊ शकतात. अशी ५९ केंद्र आहेत. याची प्रत्येक वार्डला माहिती दिली जाणार आहे. प्रत्येक वार्डच्या बाहेर या लसीकरण केंद्रांची माहिती उपलब्ध करून दिली जाईल. वॉर रुममध्येही चालू असलेल्या लसीकरण केंद्राची मिळेल,” अशी माहिती महापौरांनी दिली.
“दोन तीन गोष्टींमध्येही महापालिकेला लक्ष्य घालावं लागणार आहे. खासदार अरविंद सावंत यांनीही यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे. जैन मुनी आहेत, त्यांच्याकडे आधार कार्डचं नाही, त्याचबरोबर बेघर असलेल्यांचं लसीकरण कसं करणार? तसेच काही काळासाठी आलेले आहेत, पण त्यांच्याकडे कोणताही पुरावा नाही, अशा घटकांचा विचार होणं आवश्यक आहे आणि त्यांचा विचार महापालिका करत आहे. त्यांची नोंदणी करण्यासंदर्भात विचार केला जात आहे. स्थलांतरित मजुरांची माहिती आहे, त्यातून कार्यवाही केली जाईल. कारण ते लसीकरणापासून वंचित राहिले, तर करोना पुन्हा वाढत राहिलं,” अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.