ऑस्ट्रेलियानं घेतलेल्या निर्णयानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचं भावूक आवाहन
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
अफगाणिस्तानात तालिबानचे राज्य स्थापन झाल्यापासून देशातील क्रिकेटचे भविष्य असंतुलित आहे. दरम्यान, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) ताकीद दिली आहे, की जर तालिबानने महिलांच्या खेळावरील बंदी मागे घेतली नाही तर नोव्हेंबरमध्ये होणारी अफगाणिस्तानविरुद्धची एकमेव कसोटी रद्द केली जाईल. सीएच्या या निर्णयामुळे अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड (एसीबी) नाराज आहे.
एसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हमीद शिनवारी यांनी शुक्रवारी सीएला नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या एकमेव कसोटीसाठी अफगाणिस्तानच्या पुरुष क्रिकेट संघाचे आयोजन न करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले. सीएचे हे पाऊल आधीच संघर्ष करणाऱ्या देशाला जगापासून वेगळे करेल, असे शिनवारी यांना वाटते.
अफगाणिस्तानमध्ये अंतरिम सरकार स्थापन होताच तालिबानने क्रिकेट आणि इतर खेळांमध्ये महिलांच्या सहभागावर बंदी घातली. यामुळे अफगाणिस्तानच्या पुरुष संघावरही संकटाचे ढग विवरू लागले आहेत. आयसीसीच्या नियमांनुसार कसोटी खेळणाऱ्या सर्व देशांचा महिला क्रिकेट संघ असणे आवश्यक आहे.
नक्की प्रकरण काय?
तालिबानच्या राजवटीत महिलांना क्रिकेटसाठी परवानगी दिली नाही, तर पुढील महिन्यात अफगाणिस्तानच्या पुरुष संघाशी कसोटी सामना खेळणार नाही, असा इशारा ‘क्रिकेट ऑस्ट्रलिया’ संघटनेने गुरुवारी दिला होता. महिलांनी क्रिकेट खेळण्याची आवश्यकता नाही, असे निर्देश तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचे प्रमुख अहमदुल्ला वासिक यांनी बुधवारी दिल्यानंतर २४ तासांत ‘क्रिकेट ऑस्ट्रलिया’ने हे पत्रक काढले आहे.
‘‘महिला क्रिकेटचे जागतिकीकरण ‘क्रिकेट ऑस्ट्रलिया’ला महत्त्वाचे वाटते. क्रिकेटसारख्या खेळात समानतेच्या धोरणाला आमचा पाठिंबा आहे. प्रसारमाध्यमांमधील वृत्तांनुसार, अफगाणिस्तानमधील सत्ताधीश जर महिला क्रिकेटला पाठबळ देणार नसतील, तर आम्ही पुरुष संघाविरुद्ध कसोटी सामना खेळणार नाही,’’ असे ‘क्रिकेट ऑस्ट्रलिया’च्या पत्रकात म्हटले आहे. हा एकमेव कसोटी सामना २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत होणार आहे.