अटकेला आव्हान देणारी राज कुंद्राची याचिका फेटाळली
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणात जवळपास तीन आठवड्यांपासून अटकेत असलेला व्यावसायिक राज कुंद्रा व त्याच्या कंपनीतील आयटी प्रमुख रायन थॉर्पे या दोघांची अटकेला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने शनिवारी फेटाळली. पोलिसांकडून नोटीस मिळाल्यानंतर आरोपींनी तपासात सहकार्य करणे अपेक्षित होते. मात्र आरोपींनी पोलिसांसमोरच मोबाईलमधील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असे न्यायालयाने दोघांची याचिका फेटाळताना नमूद केले.
प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे. त्यामुळे कुंद्रा आणि थोर्पे दोघांनाही कोणत्याही प्रकारचा दिलासा देता येणार नाही, असेही न्यायमूर्ती अजय गडकरी यांनी आदेशात म्हटले आहे. अटकेनंतर कुंद्रा आणि थोर्पे मोबाईलमधील पुरावे नष्ट करत होते हे तपास अधिकाऱ्याने प्रतिज्ञापत्राद्वारे केलेल्या वक्तव्याची न्यायालयाने दोघांची याचिका फेटाळताना प्रामुख्याने नोंद घेतली. शिवाय आरोपी डोळ्यांसमोर पुरावे नष्ट करत असताना पोलिस त्याकडे डोळेझाक करू शकत नाही. आणखी पुरावे नष्ट केले जाऊ नयेत म्हणूनच कुंद्रा आणि थोर्पेला अटक करण्यात आल्याचा सरकारी वकील अरूणा पै यांचा युक्तिवादही न्यायालयाने मान्य केला. कनिष्ठ न्यायालयानेही त्यांना अटक का करण्यात आली याचे कारण पटल्यावरच दोघांना पोलीस कोठडी सुनावली.