सक्रीय कोविड रुग्णांच्या संख्येत भारतात सतत घसरण
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत भारतात उपचाराधीन दैनंदिन नव्या रुग्णसंख्येत सातत्याने घट झाल्याची नोंद झाली आहे. भारतातल्या 24 तासात 60,753 दैनंदिन नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.आता सलग 12 व्या दिवशी 1 लाखांपेक्षा कमी दैनंदिन नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. केंद्र सरकार सहित राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील सरकारांच्या सातत्यपूर्ण आणि एकत्रित प्रयत्नांमुळे हे साध्य झाले आहे. भारतात सक्रीय कोविड रुग्णांच्या संख्येत सतत घसरण दिसून येत आहे. देशातील सक्रीय कोविड रुग्णांची संख्या आज 7,60,019 आहे. सक्रिय रुग्णांची गेल्या 74 दिवसांतील ही सर्वात कमी संख्या आहे. गेल्या 24 तासांत सक्रिय रुग्णसंख्येत एकूण 38,637 ने घट झाली आणि देशातील सध्याची सक्रीय रुग्णसंख्या आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधित रुग्णसंख्येच्या केवळ 2.55 टक्के आहे.
देशातील अधिकाधिक लोक कोविड-19 आजारातून बरे होत असल्यामुळे देशात दैनंदिन पातळीवर नव्याने रोगमुक्त होणाऱ्यांची संख्या आता सलग 37 व्या दिवशी नव्या बाधितांपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे. गेल्या 24 तासांत 97,743 रुग्ण कोविडमुक्त झाले असल्याची नोंद झाली. गेल्या 24 तासांत दैनंदिन पातळीवर नव्याने रुग्णांच्या तुलनेत 37 हजारांहून अधिक (36,990) व्यक्ती कोविडमुक्त झाल्या. महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत कोरोना आजार झालेल्यांपैकी 2,86,78,390 व्यक्ती कोविड -19 मधून पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत आणि गेल्या 24 तासांत 97,743 रुग्ण रोगमुक्त झाले आहेत त्यामुळे आता एकूण रोगमुक्ती दर 96.16%, झाला असून या दरात सतत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. देशभरात कोविड चाचण्यांची क्षमता सातत्याने वाढविण्यात येत असून गेल्या 24 तासांत देशात एकूण 19,02,009 चाचण्या करण्यात आल्या. भारतात आतापर्यंत एकूण 38 कोटी 92 लाखांहून अधिक (38,92,07,637) चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकीकडे देशात चाचण्यांचे प्रमाण वाढविले जात असतानाच दुसरीकडे साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दरात सतत घसरण दिसून येत आहे. साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 3.58 टक्के असून दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 2.98 टक्के आहे. हा दर सलग 12 व्या दिवशी 5 टक्के हून कमी राहिला आहे.
भारतात आतापर्यंत कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या एकूण 27 कोटी 23 लाख मात्रा दिल्या गेल्या आहेत. शनिवारी सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, देशात 37,48,147 सत्रांद्वारे कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण 27,23,88,783 मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत एकूण 33,00,085 लसींच्या मात्रा देण्यात आल्या.