सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवासास परवानगी देण्यासाठी मनसेनं सूचवला पर्याय
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई: करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात १ जूनपर्यंत लॉकडाउन लावण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांवर कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. लॉकडाउनमध्ये राज्य सरकारकडून पुन्हा एकदा सर्वसामान्यांसाठी लोकल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. लोकलमध्ये होणारी गर्दी पाहता सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकलचे दरवाजे अजून पुढील १५ दिवसांसाठी उघडले जाणार नाहीत अशी शक्यता राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे. त्यावर आता ज्यांचे पूर्ण लसीकरण झाले आहे त्यांना लोकल प्रवासासाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात करण्यात आली आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत हा पर्याय सुचवला आहे.” ज्या नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं असेल त्यांना लोकल ने प्रवास करण्याची परवानगी दिली पाहिजे,” असं देशपांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
“लोकल ट्रेनमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळणं शक्य नाही. त्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच सुरु राहतील,” असं विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं होतं.
दरम्यान, राज्यात लॉकडाउनचे निर्बंध शिथील केले जावेत अशी मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. अनेक व्यापाऱ्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे. सरकारकडून लॉकडाउन उठवण्याची तयारी सुरु झाली असून ३० जूनपर्यंत सर्व गोष्टी पार पडतील. निर्बंध शिथील करण्यास नेमकी कधीपासून सुरुवात होईल याबाबत अद्याप स्पष्टता नाही. तिसऱ्या लाटेची भीती असल्याने निर्बंध पूर्णपणे उठवले जाणार नाहीत, मात्र काही प्रमाणात शिथीलता दिली जाऊ शकते.