प्राचीन भारतीय परंपरा परिचारिकांद्वारे होणाऱ्या सेवेमधून प्रतिबिंबित होते : राष्ट्रपती
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली, 16 सप्टेंबर (हिं.स) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एका डिजिटल समारंभात 51 पुरस्कार विजेत्या परिचारिकांना राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2020 प्रदान केले.
सर्व आरोग्य सेवा कर्मचारी आणि परिचारिकांचे अभिनंदन करत , राष्ट्रपतींनी नमूद केले की, सेवा आणि गरजूंना मदत करण्याची प्राचीन भारतीय परंपरा आपल्या परिचारिकांद्वारे होणाऱ्या सेवेमधून प्रतिबिंबित होते. राष्ट्रपतींनी कोविड -19 विरूद्धच्या शौर्य लढ्यात परिचारिकांच्या निःस्वार्थ योगदानाचे तसेच राष्ट्रीय कोविड लसीकरण कार्यक्रमाला गती देण्यासाठी परिचारिका घेत असलेल्या परिश्रमाचे उदाहरण दिले.
ते म्हणाले की,आपल्या परिचारिकांच्या सेवेप्रती असलेल्या आदर्श निष्ठेमुळे दररोज एक कोटींहून अधिक लसीच्या मात्रा देणे शक्य झाले.ते म्हणाले की, "तुमची मेहनत हा आशेचा किरण आहे आणि लोकांना अंधारातून प्रकाशाकडे नेतो." ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना राष्ट्रपती म्हणाले, "देश तुमच्या सेवेचा ऋणी राहील."
सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या प्रसूती सेवा आणि विमा योजना यासारख्या विविध उपक्रमांना राष्ट्रपतींनी अधोरेखित केले.आरोग्य सेवा प्रदान करण्यातील एक महत्त्वाचा घटक म्हणून, परिचारकांची सार्वजनिक आणि आरोग्य सेवा व्यवस्थेतील पहिला दुवा म्हणून ओळख असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया आणि केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती पवार यावेळी उपस्थित होते.
डॉ.भारती पवार यांनी आभार व्यक्त करताना, ज्यांनी जीव वाचवण्यासाठी अत्यंत कठीण काळात अथक परिश्रम घेतले, त्या सर्व परिचारिका आणि कोविड योद्ध्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
हिंदुस्थान समाचार