टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी खुशखबर; कुटुंबियांना इंग्लंड दौऱ्यात सोबत जाण्याची परवानगी
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
भारताचे पुरुष आणि महिला क्रिकेट संघ या महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून त्यांना कुटुंबियांना सोबत घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. याबाबतची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) सूत्रांनी दिली आहे. त्याचप्रमाणे सपोर्ट स्टाफचे सदस्यही कुटुंबियांना इंग्लंडला सोबत घेऊन जाऊ शकणार आहेत. कोरोनामुळे खेळाडूंना बराच काळ बायो-बबलमध्ये राहावे लागणार आहे. त्यामुळे खेळाडू मानसिकदृष्ट्या पूर्णपणे फिट राहावेत आणि त्यांना वेळ घालवण्यासाठी मदत व्हावी या हेतूने बीसीसीआयने खेळाडूंच्या कुटुंबियांना इंग्लंडला सोबत जाण्याची परवानगी देण्यासाठी विनंती केली होती. त्यांची ही विनंती मान्य झाली आहे.
महिला संघाच्या खेळाडूंसाठीही हेच नियम
भारतीय खेळाडूंसाठी खुशखबर आहे. त्यांना इंग्लंड दौऱ्यात कुटुंबियांना सोबत नेण्याची परवानगी देण्यात आली आहे. महिला संघाच्या खेळाडूंसाठीही हेच नियम असणार आहेत. सध्याच्या अवघड परिस्थितीत खेळाडूंच्या मानसिक आरोग्यावर लक्ष देणेही गरजेचे आहे. कुटुंबीय सोबत असल्याचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचे सदस्यांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहील याची बीसीसीआयला कल्पना आहे, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले. गांगुली इंग्लंडला जाणार नाही
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांच्यासह बीसीसीआयचे कोणतेही अधिकारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्याला उपस्थित राहणार नाहीत. गांगुली आणि शाह यांना क्वारंटाईनचा कालावधी कमी करण्यासाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) परवानगी दिली नाही. त्यांना १० दिवस क्वारंटाईन होणे बंधनकारक असणार आहे. संघाला असलेले नियम अध्यक्ष आणि सचिव यांना लागू होत नाहीत, असे सूत्रांनी स्पष्ट केले.