करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रानं केलं १ लाख १० हजार कोटींचं पॅकेज जाहीर!
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली : गेल्या दीड वर्षापासून देशात करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात मोठं आरोग्यविषयक संकट उभं राहिलं असताना त्याचा परिणाम म्हणून त्यापाठोपाठा देशावर आर्थिक संकट देखील ओढवलं आहे. या संकटातून देशातील सामान्यांना आणि त्यासोबतच छोट्या उद्योजकांना, कर्जदारांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी केंद्राकडून याआधीही योजना जाहीर केल्या असताना आज पुन्हा एकदा केंद्र सरकारने आरोग्य क्षेत्रासोबतच एकूण ८ क्षेत्रांसाठी नव्या योजना जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये आरोग्य विभागासाठी ५० हजार कोटींच्या पॅकेजची तर इतर क्षेत्रांसाठी ६० हजार कोटी अर्थात एकूण १ लाख १० हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. यासोबतच पीएफ संदर्भात देखील केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.
आरोग्य क्षेत्राला पाठबळ
कोविड प्रभावित क्षेत्रांसाठी १ लाख १0 हजार कोटींच्या क्रेडिट गॅरंटी योजनेची घोषणा करण्यात आली आहे. त्यापैकी करोना काळात आव्हान निर्माण झालेल्या आरोग्य क्षेत्राला पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारने घोषणा केली आहे. आरोग्य क्षेत्रासाठी ५० हजार कोटींची घोषणा करण्यात आली आहे. या निधीचा वापर आरोग्यविषयक सुविधांच्या उभारणीसाठी होणार. याव्यतिरिक्त इतर विभागांसाठी ६० हजार कोटींची घोषणा करण्यात आली आहे.
पीएफ संदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा!
गेल्या वेळी आत्मनिर्भर रोजगार योजनेअंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या घोषणेनुसार ज्या कंपन्यांची कर्मचारी संख्या १००च्या आत आहे आणि नव्याने नोकरीवर ठेवण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महिना पगार १५ हजारपर्यंत आहे, अशा कर्मचाऱ्यांचा १२ टक्के पीएफचा हिस्सा आणि अशा कंपन्यांचा पीएफमधील १२ टक्के असा एकूण २४ टक्के पीएफचा हिस्सा हा केंद्र सरकारकडून भरला जाईल. आता या योजनेची मर्यादा पुढे वाढवत ३० जून २०२१ पासून ३१ मार्च २०२२ पर्यंत करण्यात आली आहे.
पर्यटन व्यवसायाला चालना!
भारतात येणाऱ्या पहिल्या ५ लाख परदेशी व्यक्तींना व्हिसा शुल्क द्यावं लागणार नाही. व्हिसा देण्यास सुरुवात झाल्यानंतर ३१ मार्च २०२२ पर्यंत ही योजना लागू असेल. यामुळे पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा होईल. एका पर्यटकाला किंवा परदेशी व्यक्तीला एकदाच या योजनेचा फायदा घेता येईल. या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर १०० कोटींचा भार पडणार आहे.