समर प्रताप जहागीरदार की विजय धावडे? लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार समरचं खरं रूप
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
छोट्या पडद्यावर गाजत असलेली ‘पाहिले न मी तुला’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. तन्वी मुंडले, आशय कुलकर्णीबरोबर प्रथमच नकारात्मक भूमिका साकारणारा शशांक केतकर देखील प्रेक्षकांना भावतो आहे.
प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं की अनिकेतने मनूची सगळी स्वप्नं पूर्ण करण्याचा ध्यास घेतला आहे. ते दोघेही त्यांचं असं लहानसं का होईना पण सुंदर असं स्वतःचं घर उभं करणार आहेत. प्रेमाच्या बळावर, एकमेकांवर असलेल्या विश्वासाने ते त्यांचा संसार फुलवणार आहेत. घरच्यांचा राग घालवून त्यांचा आशीर्वाद घेऊन अनिकेत मनूला सुखी आयुष्य जगायचं आहे, पण या गोष्टीमुळे अपमानित आणि सैरभैर झालेला समर मानसीसाठी ईर्षेला पेटलेला आहे.
आता या मालिकेत प्रेक्षकांना अजून एक नवीन वळण पाहायला मिळणार आहे. समर हा खऱ्या आयुष्यात समर जहागीरदार नसून ‘विजय धावडे’ असल्याचे लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. समर हा स्वार्थी, दुष्ट, कपटी, स्त्री-लंपट, डूख धरणारा, बदला घेण्याची वृत्ती असलेला, एखादी वस्तू किंवा व्यक्ती मनात भरली की ती मिळेपर्यंत जीवाचं रान करणारा, वाट्टेल त्या थराला जाणारा, तर विजय धावडे उर्फ विज्या खाचखळग्यातून चुकीच्या मार्गाने आयुष्य जगणारा, स्वतःच्या सुखासाठी दुसऱ्याच्या आयुष्याची वाताहत करणारा इसम आहे.
लाल डोंगरी नावाच्या झोपडपट्टीत राहणारा. तिथल्या वाईट संगतीत तयार झालेला, मागून मिळत नाही तर हिसकावून घेणारा, लालची आणि खुनशी असा विजय संगीता नावाच्या गरीब साध्या भोळ्या मुलीशी लग्न करून संसार रेटतोय, ते फक्त एका कारणासाठी कारण ती त्याच्यासाठी लकी आहे. आता समरचं हे खरं रूप मानसीच्या आणि तिच्या परिवाराच्या समोर कधी येणार हे प्रेक्षकांना लवकरच कळेल.