‘मान्सून’ भारतीय किनाऱ्यावर धडकणार!
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
केरळ : भारताच्या दक्षिण किनाऱ्यावर उद्या (३१ मे) मान्सून धडकण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने आज याबाबतचा अंदाज वर्तवला आहे. तसेच, केरळ किनारपट्टीच्या दक्षिणेकडील भागावर उद्या पावसाळा सुरू होण्यास अनुकूल वातावरण निर्माण होईल, असे हवामान विभागाने आपल्या ताज्या अंदाजात म्हटले आहे.
अरबी समुद्रातून राज्याच्या दिशेने येत असलेल्या बाष्पामुळे राज्याच्या बहुतांश भागात आठवडाभर हलक्या स्वरूपाच्या पूर्वमोसमी पावसाची शक्यता कायम राहणार आहे. त्याचप्रमाणे बंगालच्या उपसागरातून सध्या वेगाने प्रगती करीत असलेले नैर्ऋत्य मोसमी वारे ३१ मेपर्यंत केरळमध्ये पोहोचण्यास सध्या अनुकूल स्थिती असल्याचे हवामान विभागाकडून या अगोदर स्पष्ट करण्यात आले होते. ‘यास’ चक्रीवादळाने मोसमी वाऱ्यांचे प्रवाह मोकळे केले आणि त्यांना चालना दिल्याचेही सांगण्यात आले आहे.
तसेच, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात १ जूनपर्यंत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
शनिवारी (२९ मे) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. कोकण आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी पाऊस होता. राज्यात मोसमी पावसाचे आगमन होईपर्यंत काही भागांत पूर्वमोसमी पाऊस सुरूच राहणार असल्याची स्थिती सध्या निर्माण झाली आहे.