जानेवारीनंतर प्रथमच सोने 49 हजारांवर; लवकरच 50 हजारांचा टप्पा शक्य
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
गेल्या काही महिन्यांपासून घसरणीचा सामना करणाऱ्या सोन्यात पुन्हा एकदा तेजी
परतताना दिसत आहे. बुधवारी सोन्याची किंमत पुन्हा एकदा ४९ हजार रु. प्रति १० ग्रॅमवर
गेली. याआधी शेवटी २९ जानेवारीला सोन्याचा भाव ४९ हजारांवर होता. तज्ज्ञांच्या
म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय परिस्थिती पुन्हा पिवळ्या धातूसाठी अनुकूल आहे. यामध्ये
पुढेही तेजी राहील. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनमध्ये बुधवारी २४ कॅरेट सोने
४९,१९५ रु. प्रति १० ग्रॅमवर पोहोचले. एक दिवस आधी हे ४८,६६४ रुपयांवर बंद झाले होते.
एमसीएक्समध्येही जून महिन्यात डिलिव्हरीसाठी सोन्याची किंमत ४९,०९६ रु. झाली.
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष(कमोडिटी रिसर्च) नवनीत दमानी
म्हणाले, डॉलर इंडेक्स आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत जवळपास साडेचार महिन्यांच्या
नीचांकी पातळीवर व्यवसाय करत आहे. अमेरिकी १० वर्षांची ट्रेझरी यील्ड दोन आठवड्यांच्या
नीचांकी पातळीवर व्यवसाय करत आहे. यामुळे सोने आंतरराष्ट्रीय बाजारात १९०० डॉलर
प्रति औंसवर पोहोचले आहे. हा साडेचार महिन्यांचा उच्च स्तर आहे. यामुळे देशातील
बाजारातही किमती वाढत आहेत. जाणकारांनुसार, सोन्यातील तेजीमागे डॉलर व अमेरिकी
ट्रेझरी यील्डमध्ये घट हे आहेच, मात्र महागाई व क्रिप्टोकरन्सीतील अनिश्चिततेमुळेही
गुंतवणूकदार सोन्याकडे वळत आहेत.