राणेंचा रिमोट भाजपच्या हाती- बच्चू कडू

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

राणेंचा रिमोट भाजपच्या हाती- बच्चू कडू

नागपूर,: नारायण राणे यांच्या मागे भाजपचे डोके असल्याचा आरोप शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केलेय. नारायण राणे आणि मुख्यमंत्र्यांच्या वादासंदर्भात कडू यांनी हे आरोपवजा विधान केलेय.
यासंदर्भात कडू म्हणाले की, नारायण राणे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने इतक्या खालच्या स्तराची टीका करणं योग्य नाही. आज जरी ते भारतीय जनता पक्षामुळे मंत्री झाले असतील. पण त्यांची जडणघडण शिवसेनेमध्ये झाली आहे.शिवसेनेनेच त्यांना मुख्यमंत्री केले होते.आपल्या महाराष्ट्रात राजकारण अतिषय चांगल्या पद्धतीने केले जाते.आपली संस्कृती उत्तम आहे.असे असताना राणेंनी अशा बिहारसारख्या भाषेत बोलणे कदापि योग्य नाही.यामुळे महाराष्ट्रातले राजकीय वातावरण गढुळ झाले आहे.हे जे काही झाले, त्यामागे डोकं भाजपवाल्यांचं आहे, राणे हा फक्त त्यांचा पुतळा आहे.
नारायण राणे यांचा राजकीय आणि सामाजिक अनुभव आमच्यापेक्षा खुप जास्त आहे.येथे त्यांनीही हे लक्षात घेतले पाहिजे की, आपल्याला किंवा आपल्या स्वभावाचा वापर महाराष्ट्राचे नुकसान करण्यासाठी तर केला जात नाहीये ना?कारण राणेंचे महाराष्ट्र प्रेम हे राज्यातील जनतेला माहिती आहे. अशा काही लहान सहान गोष्टी त्यांनी समजून घेतल्या तर असले वाद महाराष्ट्रात होणार नाहीत. सध्या जे काही झाले आणि सुरू आहे, त्यामध्ये कुणी बाजी मारली हा प्रश्नच नाही. येथे कुणाची तुलनाही होऊ शकत नाही.पण अशा प्रकारे थेट मारामारीची भाषा केली गेली, तर त्याचे पडसाद असेच उमटतील, असे कडू म्हणाले.
गेल्या तीन-चार दिवसांपासून महाराष्ट्रात जे काही सुरू आहे, त्यामुळे राणेंचा कुठे कमीपणा झाला किंवा शिवसेनेचा फायदा किंवा नुकसान झाले, असे काहीच नाही.तसा प्रश्नच येत नाही.नुकसान कुणाचे झाले असेल तर ते महाराष्ट्राचे झाले आहे.याचा विचार राणेंसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी केला पाहिजे. आता राहिला राणेंवरील कारवाईचा प्रश्न… तर ते स्वतः कॅबिनेट मंत्री असताना आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री असताना त्यांनी मुख्यमंत्र्यांना मारण्याची भाषा करायला नको होती. ती केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली.या कारवाईने राज्यात चांगला संदेश गेला.
मंत्र्यांनी जरी अशा प्रकारची वर्तवणूक केली, तर त्यांच्यावरही कारवाई होते, हेच या घटनांनी दाखवून दिले आहे. नाहीतर मंत्र्यांनी मंत्र्यांना शिव्या दिल्या तर चालतात आणि सामान्य माणसाने तसे केले तर लागलीच कारवाई होते, हे आता सामान्य नागरिकांच्या मनात कुठेही राहणार नाही. कारण सामान्य माणसावर जी कारवाई होते, ती नारायण राणेंवर झाली आहे. त्यामुळे जे झाले ते योग्यच झाले आणि हा विषय आता कुठेतरी संपला पाहिजे आणि महाराष्ट्राच्या विकासाकडे सर्वांनी लक्ष केंद्रीत केले पाहीजे, असे बच्चू कडू यांनी सांगितले.