अकरावीची सीईटी उच्च न्यायालयाकडून रद्द
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
इयत्ता अकरावीची सीईटी उच्च न्ययालयाकडून रद्द करण्यात आली आहे. इयत्ता दहवीच्या गुणांच्या आधारावर मुलांना अकरावीसाठी प्रवेश द्या, असें उच्च न्यायालयाने सांगितले आहे. दरम्यान, या सीईटीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी राज्य मंडळाने २ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती. तर, प्रवेश ११ वी प्रक्रिया कधी सुरु होणार?, याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. आता सीईटी रद्द करण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यासही न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे हा निर्णय म्हणजे एक प्रकारे राज्य सरकारला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेशी खेळ करता येणार नाही, प्रवेश प्रक्रिया बदलता येणार नाही. अशाप्रकारचा निर्णय उच्च न्यायालयाने दिलेला आहे.
तसेच, आता विद्यार्थ्यांना त्यांच्या अंतर्गत मुल्यमापनानुसार इयत्ता दहावीत जे गुण मिळालेले आहेत, त्या गुणांच्या आधारावरच विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावीत प्रवेश दिला जाणार आहे. याचबरोबर, सहा आठवड्यात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशही उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. तसेच, करोनाच्या काळात प्रत्यक्ष परीक्षा घेणे मुलांचा जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. त्यामुळेच न्यायालयाला याप्रकरणी हस्तक्षेप करावा लागला, असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
सीईटी संदर्भात २५ मे रोजी राज्य सरकारने जो अध्यादेश काढला होता. तो उच्च न्यायालयाने रद्द केलेला आहे. अगोदरच प्रवेश रखडलेले आहेत त्यामुळे या निर्णयाला स्थिगिती देऊन, आम्ही आणखी लांबवत नाही. मुलांचे शैक्षणिक वर्ष आधीच बऱ्यापैकी वाया गेलेलं आहे, असं म्हणत राज्य सरकारची निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी देखील न्यायालयाने फेटाळली.
राज्य मंडळाने दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे जाहीर केल्यानंतर राज्य शासनाच्या निर्णयानुसार अकरावी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेतली जाणार होती. ओएमआर उत्तरपत्रिकांद्वारे ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार होती.
निकाल अजून आमच्याजवळ आलेला नाही – बच्चू कडू
तर, ”निकाल अजून आमच्याजवळ आलेला नाही. उच्च न्यायालयाने कोणत्या मुद्द्यावर निकाल नाकारला हे आमच्याजवळ आलं, की त्याचा आढावा घेऊन आम्ही निर्णय घेऊ.” असं राज्य शिक्षणमंत्री बच्चू कडू यांनी सांगितलं आहे.
अकरावीच्या सीईटीसाठी १९ जुलैपासून नोंदणी सुरू; कशी असेल प्रवेशप्रक्रिया, जाणून घ्या!
तर, या परिक्षेतल्या गुणांच्या आधारावरच विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जाणार होता. जे विद्यार्थी ही परीक्षा देतील, त्यांना अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत प्राधान्य देण्यात येणर होते. त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर अन्य विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल आणि जे विद्यार्थी ही सीईटी देणार नाहीत, त्यांचे मूल्यमापन दहावीच्या गुणांच्या आधारावर केले जाईल, असे सांगण्यात आले होते.
अकरावी ‘सीईटी’साठी ११ लाख अर्ज
राज्य मंडळातर्फे होणाऱ्या अकरावीच्या सामायिक प्रवेश परीक्षेसाठी (सीईटी) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई), कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (सीआयएससीई) आदी मंडळांच्या ३६ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे, तर एकूण १० लाख ९८ हजार ३१८ विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र ठरलेले आहेत.