‘सोन्याची पावलं’ कलर्स मराठीवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला नवी मालिका
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
एखाद्या घरी मुलगी जन्माला आली असो किंवा मुलीने सासरी माप ओलांडून सून म्हणून गृहप्रवेश केला असो तर असं म्हणतात की, “सोन्याच्या पावलांनी लक्ष्मीच घरात आली”. नवी नवरी सोन्याच्या पावलांनी लक्ष्मीप्रमाणे घरात आली आणि सासरच्या अंगणात भरभराट झाली. अशीच काहीशी कहाणी कलर्स मराठीवर लवकरच सुरु होणाऱ्या ‘सोन्याची पावलं’ या मालिकेत पाहायला मिळणार आहे. ५ जुलैपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.
या मालिकेतील भाग्यश्रीच्या नशिबात इनामदारांची सून होणं लिहिलेलच होतं म्हणून तिची भेट दुष्यंतशी झाली आणि ते अपघाताने लग्नबंधनात अडकले. पण लग्नानंतर भाग्यश्रीचं आयुष्य पूर्णतः बदललं. तिला ‘वाहिनीसाहेब’ हा मान मिळाला. ज्यामुळे भाग्यश्रीला वाहिनीसाहेब हा मान मिळाला त्या सोन्याच्या पावलांचा आणि भाग्यश्रीचा काय संबंध आहे ? इनामदार घराण्यातील वडीलोपार्जित सोन्याची पावलं याचं काय रहस्य आहे ? या पावलांच्या पुण्याईवर दुष्यंतचा मुळीच विश्वास नाहीये. भाग्यश्रीचे दैव आणि दुष्यंतचा त्यावरील अविश्वास यामध्ये कोण खरं ठरेल ? यासर्वाचा उलगडा ‘सोन्याची पावलं’ या मालिकेत पाहायला मिळणार आहे.
एका छोट्या गावामध्ये मध्यम वर्गीय घरात वाढलेली भाग्यश्री ही अत्यंत महत्वाकांक्षी आणि मेहनती मुलगी आहे. इतरांना आनंद कसा देता येईल याच प्रयत्नात ती असते. भाग्यश्री दहा वर्षांची असताना तिची आई देवा घरी गेली आणि वडिलांनी दुसरे लग्न केले. सावत्र आईच्या जाचाला कंटाळलेल्या भाग्यश्रीला आता यातून सुटकेचा एकमेव मार्ग दिसतो आहे आणि तो म्हणजे लग्न. तर, दुसरीकडे इनामदार घराण्याचे शेंडेफळ दुष्यंत इनामदार. अत्यंत देखणा, धडाडीचा, इतरांना सल्ले देणारा, मित्रांच्या मदतीला एका हाकेवर धावणारा, लोकांना मदत करणारा. याच सवयीमुळे त्याची भाग्यश्रीशी ओळख होते आणि अपघाताने भाग्यश्री – दुष्यंतचं लग्न होतं. नियतीमुळेच दोन वेगळी विश्व असलेले भाग्यश्री आणि दुष्यंत एकत्र येतात. एकमेकांचे जोडीदार बनून ते एक नवं विश्व निर्माण करतील ? इनामदारांच्या घराची सून ते गावाची वाहिनीसाहेब होण्यापर्यंतचा भाग्यश्रीचा हा प्रवास कसा असेल हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.