युसूफ पठाण पुन्हा फटकेबाजीसाठी तयार, या लीगमध्ये खेळणार
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
भारताचा माजी ऑल राऊंडर युसूफ पठाण (Yusuf Pathan) मैदानात पुनरागमन करण्यासाठी तयार आहे. पठाण यावर्षी लंका प्रीमियर लीगमध्ये (LPL) खेळताना दिसेल. पठाणशिवाय आणखी काही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी एलपीएलसाठी आपल्या नावाची नोंदणी केली आहे. मागच्या वर्षी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आपल्या खेळाडूंना लीगमध्ये भाग घेण्याची परवानगी दिली नव्हती, यावर्षी मात्र बांगलादेशचे खेळाडू एलपीएल खेळणार आहेत. बांगलादेशचे स्टार खेळाडू शाकीब अल हसन आणि तमीम इक्बाल एलपीएलमध्ये सहभागी होतील.
दक्षिण आफ्रिकेच्या वनडे टीमचा कर्णधार तेम्बा बऊमानेही आपण एलपीएलसाठी उपलब्ध असल्याचं सांगितलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला मॉर्नी मॉर्कलही या स्पर्धेत खेळताना दिसेल. याआधी मॉर्कल ऑस्ट्रेलियातल्या बिग बॅश लीगमध्ये खेळला होता. याशिवाय दक्षिण आफ्रिकेचे स्पिनर केशव महाराज आणि तबरेज शम्सीही श्रीलंकेत खेळतील.
युसूफ पठाणचा छोटा भाऊ इरफान पठाण मागच्या वर्षी एलपीएलमध्ये कॅन्डी टस्कर्सकडून खेळला होता. न्यूझीलंडचा मिचेल मॅकलॅनघन, झिम्बाब्वेचा ब्रेण्डन टेलर, अमेरिकेचा अली खान आणि नेपाळचा संदीप लामिचाने देखील एलपीएल खेळण्याासाठी उत्सुक आहेत.
ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा, जेम्स फॉल्कनर, बेन डंक आणि कॅलम फर्ग्युसननेही एलपीएलसाठी नोंदणी केली आहे. वेस्ट इंडिज टी-20 टीमचा उपकर्णधार निकोलस पूरन या लीगमधल्या मोठ्या चेहऱ्यांपैकी एक आहे.