भारत-इंग्लंड कसोटी मालिका : शार्दूलच्या खेळीनंतर इंग्लंडचे चोख प्रत्युत्तर
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
लंडन : मुंबईकर अष्टपैलू शार्दूल ठाकूर (६० धावा) आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत (५०) यांनी रचलेल्या बहुमूल्य शतकी भागीदारीमुळे चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने इंग्लंडला ३६८ धावांचे लक्ष्य दिले. मात्र इंग्लंडच्या सलामीवीरांनी दमदार सुरुवात करून भारताला चोख प्रत्युत्तर दिल्यामुळे अखेरच्या दिवशी कोणता संघ बाजी मारतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
ओव्हल येथे सुरू असलेल्या या कसोटीतील चौथ्या दिवसअखेर इंग्लंडने बिनबाद ७७ धावा केल्या असून त्यांना विजयासाठी आणखी २९१ धावांची आवश्यकता आहे. हसीब हमीद ४३, तर रॉरी बर्न्स ३१ धावांवर खेळत आहे.
शनिवारच्या ३ बाद २७० धावांवरून पुढे खेळताना कर्णधार विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी सावध सुरुवात केली. परंतु ख्रिस वोक्सने जडेजा (१७) आणि अजिंक्य रहाणे (०) यांना लागोपाठच्या षटकात बाद करून भारताला अडचणीत टाकले. मोईन अलीने कोहलीचा (४४) अडसर दूर केला. ६ बाद ३१२ धावांवरून शार्दूल-पंत जोडीने सूत्रे सांभाळली. शार्दूलने कारकीर्दीतील तिसरे आणि सामन्यातील दुसरे अर्धशतक झळकावले. हे दोघे माघारी परतल्यावर उमेश यादव (२५) आणि जसप्रीत बुमरा (२४) यांनीही मोलाचे योगदान दिल्यामुळे भारताने ४६६ धावांपर्यंत मजल मारली.