मराठा क्रांती मोर्चाकडून मुंबईत बाईक रॅली
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा संघटनांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. आज मुंबईत या मागणीसाठी मराठा क्रांती संघर्ष मोर्चाकडून बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं. या रॅलीमध्ये अनेक आंदोलकांनी सहभाग नोंदवला. त्याचबरोबर प्रवीण दरेकर, आशिष शेलार हे भाजपा नेतेही या रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत.
सोमय्या मैदान ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत ही बाईक रॅली काढण्यात येणार आहे. मुंबईच्या विविध भागांमधून आंदोलक या रॅलीमध्ये सहभागी होत आहेत. भाजपा नेते आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांनीही या रॅलीमध्ये सहभाग नोंदवला.
यावेळी बोलताना आशिष शेलार म्हणाले, “ज्याप्रमाणे आरक्षणाबद्दल दिरंगाई सुरु आहे, ती अक्षम्य आहे. राज्य सरकारचं आरक्षणाबाबत अजूनही मत बनलेलं नाही. या दिरंगाईचा परिणाम समाजाच्या संयमाला नख लागेल असा होऊ नये ही आमची मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. मुख्यमंत्री साहेब, भाषणं सोडा, कृती दाखवा”.
तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही या रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत. ते म्हणाले, “मराठा समाजाचा संघर्ष आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे आता ह्या आंदोलनांच्या माध्यमातून हा आमचा निर्वाणीचा इशारा आहे. ठाकरे सरकारने आरक्षणाचा विषय गांभीर्याने घ्यावा. मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसली आहेत. फडणवीस सरकारने केलेल्या तरतुदी तरी तात्काळ पुन्हा द्याव्यात अशी आमची मुख्यमंत्र्यांना विनंती आहे”.