विराटनं जिंकली नाणेफेक
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आजपासून लीड्सच्या हेडिंग्ले क्रिकेट मैदानावर रंगत आहे. भारताने १-० ने आघाडी घेतल्याने इंग्लंडवर दडपण आहे. हा सामना जिंकत मालिकेत बरोबरी साधण्याची इंग्लंडची धडपड असेल. दुसरीकडे भारताने हा सामना जिंकल्यास ३५ वर्षापूर्वीच्या विक्रमाची बरोबरी होणार आहे. यापूर्वी १९८६ मध्ये कपिल देवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने इंग्लंडला २-० ने पराभूत केले होते. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. विराटने मागील सामन्यातील संघ या कसोटीतही कायम राखला आहे.
हेडिंग्ले हे नेहमीच क्रिकेटपटूंसाठी एक वास्तविक कसोटी घेणारे मैदान राहिले आहे. येथे बचावात्मक खेळाला फारसा वाव नाही. गेल्या २० वर्षांची आकडेवारी या वस्तुस्थितीची साक्ष आहे. या दरम्यान, हेडिंग्ले येथे झालेल्या १८ पैकी १७ कसोटी सामन्यांचा निकाल लागला आहे. २०२१मध्ये फक्त एक कसोटी अनिर्णित राहिली.
वेगवान चौकडीच कायम
हेडिंग्लेमधील वातावरण हे थंड असल्यामुळे वेगवान गोलंदाजांचेच खेळपट्टीवर वर्चस्व दिसून येईल. या परिस्थितीत भारताने वेगवान चौकडीचीच रणनीती आखून, पुन्हा रवीचंद्रन अश्विनला विश्रांती दिली आहे. जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज हे गोलंदाज आपल्या मागील सामन्यातील कामगिरी पुन्हा करण्यास उत्सुक आहेत.
दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, के. एल. राहुल.
इंग्लंड : जो रूट (कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, रोरी बर्न्स, जोस बटलर (यष्टीरक्षक), सॅम करन, हसीब हमीद, डेव्हिड मलान, क्रेग आव्हर्टन, ऑली रॉबिन्सन.