अनिल देशमुख यांच्यावरील कारवाईमुळे संजय राऊत संतापले
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्याविरोधात सक्तवसुली संचलनालयाकडून सुरु असलेल्या कारवाईवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. राज्यातील तपास यंत्रणा सक्षम असताना केंद्रीय यंत्रणा मागच्या दाराने आणल्या जात असल्याची टीका त्यांनी केली आहे. तसंच केंद्रीय पथकं कोणाच्या तरी दबावाखाली कारवाई करत असतील तर हे संघराज्य व्यवस्थेला हानीकारक आहे असंही ते म्हणाले प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.
“हा दबावाचा प्रश्न नाही, तर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जात आहे. प्रताप सरनाईक यांच्या पत्रात विनाकारण त्रास दिला जात आहे याचा उल्लेख असल्याचं मी वारंवार सांगत आहे. या तक्रारींचा तपास या राज्याचे पोलीस, तपास यंत्रणा निष्पक्षपणे करु शकतात, न्यायालयं आहेत. तरीदेखील मागच्या दाराने केंद्रीय तपास यंत्रणा आणल्या जात असतील तर शरद पवार म्हणतात ते बरोबर आहे की सत्ता गेल्यामुळे निराशा आणि वैफल्यातून अशा चौकशांचा ससेमिरा मागे लावला जात आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहे.
संजय राऊत यांनी सामनामध्ये ईडीची तुलना ब्रिटिशांच्या राजवटीशी केली आहे. यासंबंधी बोलताना ते म्हणाले की, “सत्तापक्षातील काही लोकांवर ठरवून कारवाई केली जाते. गुन्ह्यांचं स्वरुप पाहता राज्यातील तपास यंत्रणा समर्थ आहेत. पण केंद्रीय पथक कोणाच्या तरी दबावाखाली कारवाई करतात हे संघराज्य व्यवस्थेला हानीकारक आहे”. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबऱ अखेरपर्यंत लसीकरण पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून विश्वास व्यक्त केला आहे. यासंबंधी बोलताना ते म्हणाले की, “जर पंतप्रधानांनी हा निर्णय घेतला असेल तर त्यांचं स्वागत करतो”. दरम्यान मोदींनी बनावट लसीकरण शिबीरांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असून संजय राऊत यांनी मुंबई पोलिसांनी जबरदस्त कारवाई केली असून ते सक्षम असल्याचं म्हटलं आहे.