मेरी कोम, साक्षी अंतिम फेरीत
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
सहा वेळा जगज्जेतेपद पटकावणारी भारताची अव्वल बॉक्सिंगपटू एम. सी. मेरी कोम तसेच साक्षी (५४ किलो) यांनी आपापल्या प्रतिस्पध्र्यावर मात करत आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. मात्र सिमरनजित कौर (६० किलो), मोनिका (४८ किलो), जस्मिन (५७ किलो) आणि लव्हलिना बोर्गोहेन यांचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले.
लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेत्या मेरी कोमने मोंगोलियाच्या लुटसैखान अल्टानसेतसेग हिच्यावर ४-१ असा विजय प्राप्त केला. यासह अव्वल मानांकित मेरीने किमान रौप्यपदक निश्चित केले आहे. मेरी कोमला अंतिम फेरीत कझाकस्तानच्या नझीम कायझाबायचा सामना करावा लागेल. पहिल्या फेरीत काहीशी सावध सुरुवात करणाऱ्या मेरीला अल्टानसेतसेग हिने जोरदार ठोसे लगावले. पण हार न मानता मेरीने दुसऱ्या फेरीत जोमाने पुनरागमन केले. मेरीच्या आक्रमक खेळाला अल्टानसेतसेगकडे उत्तर नव्हते. तिसऱ्या फेरीतही मेरीने वर्चस्व गाजवत ही लढत जिंकली.
दोन वेळा युवा जगज्जेती ठरलेल्या साक्षी हिने कझाकस्तानच्या अव्वल मानांकित दिना झोलामान हिचे कडवे आव्हान ३-२ असे परतवून लावले. तिला जेतेपदासाठी उझबेकिस्तानच्या सितोरा शोगदारोव्हा हिच्याशी लढत द्यावी लागेल. लालबुआतसैहीने (६४ किलो) कुवैतच्या नौरा अल्मुतारीला सहज हरवत अंतिम फेरी गाठली.
मोनिका हिला कझाकस्तानच्या अलुआ बाल्कीबेकोव्हा हिच्याकडून ०-५ अशी हार पत्करावी लागली. सिमरनजित हिच्यावर कझाकस्तानच्या रिम्मा वोलोसेंको हिने निर्विवाद वर्चस्व गाजवले. जस्मिन हिलाही कझाकस्तानच्या व्लादिस्लावा कुखता हिने पराभूत केले. लव्हलिनाला उझबेकिस्तानच्या नावबाखोर खामिदोव्हा हिने २-३ असे हरवले.