अखेर तेलंगणा राष्ट्र समितीचे जेष्ठ नेते इटला राजेंदर यांचा भाजपात प्रवेश
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली : अत्यंत उत्कंठावर्धक राजकीय घटनाक्रमानंतर अखेर तेलंगणाचे माजी आरोग्य मंत्री आणि तेलंगणा राष्ट्र समितीचे जेष्ठ नेते इटला राजेंदर यांनी सोमवारी नवी दिल्लीतील केंद्रीय भाजप कार्यालयात अधिकृतपणे भाजपात प्रवेश केला. यावेळी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय गृहराज्य मंत्री आणि सिकंदराबादचे खासदार गंगापूरम किशन रेड्डी, तेलंगणा भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार बंडी कुमार संजय, जेष्ठ नेत्या डी के अरुणा, भाजपचे तेलंगणा प्रभारी आणि राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग आणि अन्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. काही दिवसांपासून इटला राजेंदर केंद्र आणि राज्य भाजपच्या नेत्यांच्या संपर्कात होते. मंत्रिपद गेल्यापासून चंद्रशेखर राव यांच्याविरुद्ध त्यांनी रान उठविले असून खुले राजकीय आव्हान निर्माण केले आहे. तेलंगणा आंदोलनापासून इटला राजेंदर आणि के चंद्रशेखर राव सोबत कार्यरत आहेत. त्यामुळे अचानक निर्माण झालेल्या राजकीय स्थित्यंतरानंतर राज्यात काय परिणाम होणार याकडे राजकीय वर्तुळात लक्ष लागले आहे.
शनिवारी इटला राजेंदर यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला . इटला राजेंदर यांनी हुजुराबाद विधानसभा मतदार संघातून राजीनामा दिला होता. भर कोरोना संकटात भूमी अतिक्रमण केल्याच्या कथित आरोपावरून तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख के चंद्रशेखर राव यांनी मागील महिन्यात इटला राजेंदर यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करीत त्यांच्यावर असलेल्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी समिती स्थापन केली. यातून नाराज होत सुदीर्घ चर्चा आणि मंथन करून आपला विरोध दर्शवत इटला राजेंदर यांनी शनिवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. के चंद्रशेखर राव यांच्या विरुद्ध आघाडी उघडत इटला राजेंदर अनेक विषयांवर भाष्य करीत आहेत. त्यामुळे तेलंगणा राष्ट्र समिती आणि भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर आले आहेत.
हिंदुस्थान समाचार