जागतिक महिला बुद्धिबळ स्पर्धा : रुपेरी यश!
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
भारताला ‘फिडे’ जागतिक महिला सांघिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत पहिल्यांदाच रौप्यपदकाची कमाई करण्यात यश आले. अंतिम फेरीत रशियाने भारतावर २-० अशी मात केली.
अंतिम लढतीच्या पहिल्या डावात भारताची अव्वल खेळाडू द्रोणावल्ली हरिकाने चांगली सुरुवात केली. तिने अलेक्झांड्रा गोर्याचकिनाचा पराभव करत विजयी सलामी दिली. मात्र, भक्ती कुलकर्णीला कतरिना लाग्नोने, तर आर. वैशालीला अलेक्झांड्रा कोस्तेनिऊकने पराभूत केले. तसेच मेरी अॅन गोम्स व एलिना कॅशलिन्सकाया यांच्यातील सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे पहिल्या डावात रशियाने २.५-१.५ अशी सरशी साधली.
दुसऱ्या डावात हरिका आणि गोर्याचकिना, तसेच वैशाली आणि कोस्तेनिऊक यांच्यातील सामने बरोबरीत संपले. उपांत्य फेरीत महत्त्वपूर्व विजय मिळवणाऱ्या तानिया सचदेवचा खेळ अंतिम फेरीत फारसा बहरला नाही. तिला लाग्नोकडून पराभव पत्करावा लागला, तर गोम्सवर पोलिना शुव्हालोव्हाने मात केल्याने भारताने दुसरा डाव १-३ अशा मोठ्या फरकाने गमावला. अंतिम फेरीत पराभव झाला असला तरी भारताने या स्पर्धेत पहिल्यांदाच पदक जिंकण्याची दमदार कामगिरी केली.
तत्पूर्वी, भारताने जॉर्जियाला १.५-०.५ असे, तर रशियाने युक्रेनला २-० असे नमवून अंतिम फेरी गाठली.