“रोहित शर्मा लवकरच कर्णधार होईल”, निवड समितीच्या माजी अध्यक्षांचं मोठं वक्तव्य
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू रोहित शर्माला लवकरच कर्णधारपदाची संधी मिळू शकते असं निवड समितीचे माजी अध्यक्ष किरण मोरे यांनी म्हटलं आहे. भारतीय क्रिकेट संघात लवकरच वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगवेगळे कर्णधार असतील अशी शक्यताही किरण मोरे यांनी व्यक्त केली आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते
“मला वाटतं बोर्डाचं व्हिजन काय आहे यावर या गोष्टी अवलंबून असतात. रोहित शर्माला लवकरच संधी मिळेल असं मला वाटतं. विराट कोहली धोनीच्या नेतृत्वात खेळला असून हुशार कर्णधार आहे. अजून किती काळ टी-२० आणि कसोटी संघाचं नेतृत्व करु इच्छितो याचा विचार तोदेखील करत असेल. इंग्लंद दौऱ्यानंतर अशा अनेक निर्णयांबद्दल शिकण्यास मिळेल,” असं किरण मोरे यांनी सांगितलं आहे.
इंग्लंड, ऑस्ट्रेलियासारख्या अनेक संघांमध्ये कसोटी आणि मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी वेगवेगळे कर्णधार असून भारतातही हा प्रयत्न यशस्वी होऊ शकतो असा विश्वास किरण मोरे यांनी व्यक्त केला आहे.
“भारतातही हा फॉरमॅट यशस्वी होईल. वरिष्ठ खेळाडूंना भारतीय संघाच्या भविष्याबद्दल काय वाटतं हे महत्वाचं आहे. तिन्ही संघाचं नेतृत्व करत चांगली कामगिरीदेखील करणं विराटसाठी सहज बाब नाही. पण प्रत्येक फॉरमॅटमध्ये नेतृत्व करताना चांगली कामगिरी करत विजय मिळवणं याबद्दल मी त्याला श्रेयदेखील देतो, पण मला वाटतं ती वेळ येईल जेव्हा विराट कोहली आता बास झालं, रोहितला नेतृत्व करु दे असं सांगेल,” असं किरण मोरे म्हणाले आहेत.
दरम्यान किरण मोरे यांनी यावेळी ऋषभ पंतकडे आपण भविष्यातील भारतीय संघाचा कर्णधार म्हणून पाहत असल्याचं सांगितलं. किरण मोरे भारतीय संघाचे यष्टीरक्षक होते. १९८४ ते १९९३ काळात ते भारतीय संघातून खेळले आहेत. यानंतर बीसीसीआयमधील निवड समितीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती.
सध्या तिन्ही फॉरमॅटमध्ये विराट कोहली भारतीय संघाचं नेतृत्व करत असून रोहित शर्माकडे टी-२० आणि एकदिवसीय संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे. तर कसोटीमध्ये उपकर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे आहे. रहाणेच्या नेतृत्वातच भारताने ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक विजय मिळवला होता.