मुंबईत दिवसभरात १,५४४ रुग्ण, ६० जणांचा मृत्यू
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होऊ लागली असून रुग्ण दुप्पटीचा कालावधीही वाढत आहे. गेल्या २४ तासांमध्ये रुग्ण दुप्पटीच्या कालावधी सुमारे १८ दिवसांनी वाढ होऊन तो २३१ दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईकरांच्या दृष्टीने ही दिलासादायक बाब आहे. दरम्यान, मुंबईतील १५४४ नागरिकांना रविवारी करोनाची बाधा झाली. तर, ६० रुग्णांचा मृत्यू झाला.
फेब्रुवारीपासून वाढणारी मुंबईतील रुग्णसंख्या हळूहळू कमी होऊ लागली आहे. चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्यामुळे रुग्णसंख्या घसरू लागल्याची चर्चाही पालिकेत सुरू आहे. रविवारी १५४४ जणांना बाधा झाल्यानंतर मुंबईतील करोनाबाधित रुग्णांची संख्या सहा लाख ८८ हजार ६९६ वर पोहोचली आहे. विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेणारे ३३ पुरुष आणि २७ महिलांचा रविवारी करोनामुळे मृत्यू झाला असून त्यापैकी ३५ जणांना दीर्घकालीन आजार होते. आतापर्यंत मुंबईतील १४ हजार २६० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेणारे २,४३८ रुग्ण रविवारी करोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. आतापर्यंत सहा लाख ३६ हजार ७५३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. आजघडीला विविध रुग्णालयांमध्ये ३५ हजार ७०२ रुग्ण उपचार घेत आहेत. करोनाबाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी गेल्या २४ तासांमध्ये २२ह हजार ४३० चाचण्या करण्यात आल्या होत्या. आतापर्यंत मुंबईत ५८ लाख ९८ हजार ६०५ चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईतील करोना वाढीचा दर ०.२९ टक्क्य़ांवर, तर रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाण ९२ टक्क्य़ांवर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांमध्ये करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अति जोखमीच्या गटातील १९ हजार ८८७ संशयीत रुग्णांचा शोध घेण्यात यश आले असून यापैकी ९०९ संशयीत रुग्णांना संस्थात्मक विलगीकरण केंद्रात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित संशयीत रुग्णांना अटीसापेक्ष गृहविलगीकरणात राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.