नुसताच धुरळा
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
महाराष्ट्रात सध्या राजकीय धुरळा उडवला जात आहे. प्रत्येक नेता आपापल्या परीने त्यात भर घालत आहे. आता भाजप आणि शिवसेना पुन्हा एकदा एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यादृष्टीने भाजप आणि सेना नेत्यांची वक्तव्येहि येत आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच सूचक विधान करून खळबळ उडवून दिली. भाजप आणि शिवसेना यांच्यात शत्रुत्व नाही तर फक्त मतभेद आहेत, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. तिकडे शिवसेना नेते संजय राऊत यांनी आमचे नाते आमिर खान आणि किरण राव यांच्यासारखे आहे, असे सांगून भाजप आणि शिवसेना पुन्हा जवळ येत असल्याचे संकेत दिले आहेत. अर्थात या दोघांच्याही वक्तव्यांमुळे राज्यात संभ्रम तर निर्माण झालाच आहे पण कांग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पोटात गोळा उठला आहे. भाजप आणि शिवसेना हे नैसर्गिक शत्रु नाहीत, असे दोन्ही पक्ष मानतात. त्यामुळे हे दोन पक्ष पुन्हा कधीही एकत्र येऊ शकतात, याची कल्पना दोन्ही काँग्रेसला होतीच. परंतु सध्या या दोन पक्षातील मतभेदांना आलेले कमालीचे कडवट स्वरूप आणि त्यांचे एकमेकांवर चढवण्यात आलेले तिखट हल्ले यामुळे भविष्यात कधी हे पक्ष एकत्र येतील, असे कुणालाही वाटत नव्हते. पण भाजप आणि सेनेच्या विविध नेत्यांच्या वक्तव्यांमुळे अशी लक्षणेही दिसत आहेत. आणि पराकोटीचा द्वेष करूनही पुन्हा राजकीय पक्ष एकत्र येतात तेव्हा त्यांनी एक सोपे समर्थन तयार करून ठेवले आहे.राजकारणात कुणीच कायमचा मित्र किंवा शत्रु नसतो, या गोंडस तत्वाखाली हे एकमेकांच्या उरावर बसणारे पक्ष पुन्हा सरकार स्थापनेची करू शकतात. भाजप आणि शिवसेना यांनी पुन्हा दोन्ही पक्ष एकत्र येतील, असे संकेत दिल्याची कारणमिमांसा करणे अवघड नाही. सध्या भाजपमध्ये सत्ता नसल्याने अस्वस्थता आली आहे. भाजपमधील आमदार अस्वस्थ आहेत आणि दुसरे पर्याय शोधत असल्याची कुणकुण लागताच फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून तशी विधाने येत आहेत. तिकडे शिवसेनेची वेगळीच कथा आहे. कांग्रेस आणि राष्ट्रवादी हे शिवसेना वाढू देणार नाहीत हे सेनेला पक्के लक्षात ठेवायचे आहे. शिवाय कांग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तालावर शिवसेनेला मनात नसूनही नाचावे लागत आहे. आता जर सेनेने काही हालचाल केली नाही तर दोन्ही काँग्रेस मिळून आपल्याला संपवल्याशिवाय रहाणार नाहीत, हेही सेनेला माहित आहे. कांग्रेस आणि राष्ट्रवादी यांना आपल्य कडेही पर्याय आहेत, हे दाखवण्यासाठी सेना नेते मुद्दाम संभ्रम निर्माण करणारी विधानं करत आहेत. सेना आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपशी जुळवून घेण्याबाबतीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलेला सल्ला हे याच साखळीतील आहे. भाजप आणि शिवसेना आमदार सारखेच अस्वस्थ आहेत. कांग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाशी जुळवून घेणे सेनेला अवघड जात आहे. शिवसेना नेत्यांची एकामागून येत असलेली भ्रष्टाचार प्रकरणे आणि राष्ट्रवादी नेते तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची शंभर कोटींची वसुली प्रकरणी सक्तवसुली संचालनालय म्हणजे ईडीकडून सुरू असलेल्या चौकशीचा जबरदस्त धक्का महाविकास आघाडी सरकारला बसला आहे. यामुळे सरकारची प्रतिमा धुळीस मिळाली आहे. यातून शिवसेनेचे जास्तीत जास्त नुकसान करण्याचे दोन्ही काँग्रेसचे इरादे उघड झाले आहेत. शिवसेनेचे सर्वात जास्त नुकसान निवडणुकीत होणार आहे. त्यामुळे तिघाही पक्षांना एकमेकांपासून काडीमोड हवा आहे. पण सरकारवर पहिला घाव घालण्याचे पातक आपल्या माथी येऊ नये, यासाठी तिन्ही पक्ष सावधानता बाळगत आहेत. केंद्र सरकार राज्यातील मविआ नेत्यांच्या मागे हात धुऊन लागले आहे, असा आरोप केला जात आहे. प्रत्यक्षात या नेत्यांचा भ्रष्टाचार आता उघड होत आहे.याचाही फटका निवडणुकीत तिन्ही पक्षांना बसणार आहे. म्हणून जो तो आता सुटका करून घेण्याच्या मागे आहे. केंद्रातील भाजपशी जुळवून घेण्याशिवाय पर्याय नाही हे शिवसेनेने ओळखले आहे. भाजप आणि शिवसेना हे पुन्हा एकदा एकत्र येऊ शकतात. त्यासाठी कारण तयार केले जाईल. हिंदुत्वाचा मुद्दा तर आहेच. शिवसेनेला पुन्हा भाजपकडे येण्यासाठी सेफ पॅसेज तयार केला जाईल. कांग्रेस राष्ट्रवादी पुन्हा विरोधी पक्षात जातील. हे काही स्वप्नरंजन नाही. असे होऊ शकते. जर्मनीची भिंत जर पाडली जाऊ शकते तर भाजप शिवसेना पुन्हा एकत्र का येऊ शकत नाहीत, असेही विचारले जाऊ शकते. महाराष्ट्रात आगामी काळात राजकारण खूप मोठे वळण घेण्याची शक्यता आहे. फडणवीस आणि राऊत यांनी त्याचा शुभारंभ केलेला असू शकतो.