देदिप्यमान धाव
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
भारताला अभिमान वाटावा असे राष्ट्रीय ते आंतरराष्ट्रीय क्षेत्रात अलौकिक कामगिरी केलेले धावपटु मिल्खा सिंग यांचे कोरोना आजाराने निधन झाले. पाकिस्तानातील पंजाबात जन्मलेल्या मिल्खा सिंग यांनी फाळणीच्या जखमा सतत अंगावर बाळगल्या. त्यांच्या आईवडलांची दंगलखोरांनी हत्या केली आणि त्यानंतर वडलांनी मृत्युसमयी त्यांना उद्देष्यून भाग मिल्खा भाग असे शब्द उच्चारले. ते त्यांनी प्रत्यक्षात आचरणात आणले आणि नंतर ते धावले ते जीव वाचवण्यासाठी नव्हे तर भारताची मान आंतरराष्ट्रीय धावण्याच्या स्पर्धेत देदिप्यमान विक्रम करून ताठ उंचावण्याच्या उद्देष्याने धावले. जीव वाचवण्यासाठी धावलेला हा तरूण नंतर राष्ट्रीय, आशियाई, राष्ट्रकुल आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत धावला आणि त्याने पदके मिळवली, आंतरराष्ट्रीय लौकिक मिळवला आणि तो भारतीयांच्या गळ्यातील ताईतही बनला होता. रोम आणि टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. ऑलिंपिकमध्ये चारशे मीटरचे अंतर केवळ पंचेचाळीस पूर्णांक नऊ सेकंदात पार केले आणि आजतागायत कुणालाही हा विक्रम मोडता आलेला नाहि. अठ्ठावनच्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्यांनी दोनशे आणि चारशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदकही मिळवले. पण हे त्यांचे रेकॉर्ड सगळीकडे उपलब्ध आहे. त्यामुळे त्याची जंत्री देण्याची काही आवश्यकता नाहि. मुद्दा हा आहे की, मिल्खा सिंग यांनी हे यश कोणतीही परिस्थिती अनुकूल नसताना मिळवले. काही स्पर्धेत तर ते बुटांशिवायही धावले आणि सरावाची कमी असतानाही त्यांनी जोरदार यश मिळवले. त्यांचा हा गुणविशेष आहे. आजकालच्या खेळाडुंइतक्या ट्रेनर, अत्याधुनिक उपकरणे, आहारावर नियंत्रण ठेवण्यासाठीची यंत्रणा वगैरे काहीही त्यांच्या काळात आणि त्यांना उपलब्ध नव्हते. तरीही मिल्खा सिंग यांच्यानंतर प्रचंड यश मिळवणार्या पीटी उषा आणि अश्विनी नाचप्पा या दोघीच निघाल्या. प्रतिकूल परिस्थितीत मिल्खा सिंग यांनी बजावलेली कामगिरी अभूतपूर्व आणि अलौकिक आहे. पंडित नेहरू यांच्या आग्रहावरून मिल्खा सिंग यांना पाकिस्तानात धावण्याच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी जाव लागले. पण तेथेच त्यांना फ्लाईंग सिख हा मानाचा किताब मिळाला. आणि हा किताब त्यांना दिला तो पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती अयुब खान यांनी तो किताब त्यांना दिला. ज्या देशात त्यांच्या आईवडलांची हत्या झाली, त्याच देशाने त्यांचा या शब्दांत गौरव करावा, यापेक्षा वेगळे यश ते काय असते. मिल्खा सिंग यांच्या काळात सुविधा नव्हत्या, मात्र सारेच खेळाडू प्रचंड दर्जेदार होते. परदेशातही आणि देशातही केवळ दर्जा हाच एक निकष लावला जायचा. वशिलेबाजीतून निवड वगैरे भानगडी नव्हत्याच. आणि खेळाडूंमध्ये कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी यश मिळवण्याची दुर्दम्य आस होती. मिल्खा सिंग हे याचे उत्कृष्ट उदाहरण होते. ते अनेक धावपटुंचे पुढे प्रेरणास्थान बनले. अनेक खेळाडूंनी त्यांना आपला आदर्ष मानले आणि पुढे त्यांचाच वारसा चालवला. भारतात तेव्हाही क्रिकेट लोकप्रिय होते. परंतु आजच्या इतके नव्हते आणि श्रीमंत तर मुळीच नव्हते. त्यामुळे सार्याच खेळाडूंना समान न्याय दिला जात होता. आज क्रिकेटच्या सितार्यापुढे अन्य खेळांतील सारे सितारे झाकोळून गेले आहेत. त्यामुळे मिल्खा सिंग यांना भारतासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली आणि त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले. मिल्खा सिंग यांच्या यशाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे धावण्याची स्पर्धा ही शरिराचा कस पहाणारी स्पर्धा असली तरीही तिला ग्लॅमर नाहि. धावपटुंना हल्ली तरी सुविधा मिळतात. तेव्हा तर काहीच नव्हते. आणि धावण्याच्या क्रिडाप्रकाराला काही लागतही नाहि. क्रिकेटचे किट, टेनिस रॅकेट अशी महागडी साधने लागतही नाहित. त्यामुळे धावण्याची स्पर्धा ही खर्या अर्थाने सामान्य आणि गोरगरिबांचे प्रतिनिधित्व करणारी स्पर्धा आहे. अशा स्पर्धेचे प्रेरणास्थान मिल्खा सिंग बनावेत, यातच त्यांचे महानत्व दडलेले आहे. धावपटुचे यश हा सामान्यांचा आवाज असतो. धावपटुंनी कितीही देदिप्यमान यश मिळवले तरीही त्यांना कुणी जाहिरातीही देत नाहित. क्रिकेटपटु हे जाहिरातींत झळकणार्यांमध्ये प्रथम आणि त्यानंतर टेनिस किंवा बॅडमिंटन पटु वगैरे. परंतु धावपटुंना कंपन्यांच्या जाहिराती मिळाल्याची उदाहरणे नाहित. पी टी उषा असो की अश्विनी नाचप्पा, त्या कधी मोठ्या कंपन्यांच्या जाहिरातीत झळकल्याचे आठवत नाहि. अशा खेळाक़डे नवी पिढी वळणार कशी, हा प्रश्नच आहे. परंतु मिल्खा सिंग आणि उषा वगैरे खेळाडुंमुळे मोठ्या संख्येने तरूण खेळाडू स्प्रिंट स्पर्धेकडे वळले आणि काहींनी चांगले यशही मिळवले आहे. हे निःसंशय मिल्खा सिंग यांचेच कर्तृत्व आहे. मिल्खा सिंग यांनी खरेतर भारत आंतरराष्ट्रीय जगताला माहित करून दिला. नाहितर भारताबद्दल परदेशी लोक केवळ अनभिज्ञ होते. भारताचा धावपटु राष्ट्रकुल स्पर्धेत धावण्यासाठी आलाय, हे समजल्यावर केवळ आश्चर्य होते. परंतु त्यांनी दोन सुवर्णपदके जिंकल्यावर भारताबाबत सार्या जगाचेच मत बदलले. क्रिकेटच्या महावृक्षाने भारतात सार्या इतर खेळांची रोपे खुडून टाकली आहेत. क्रिकेट म्हणजेच सारे क्रिडाक्षेत्र असे समजल्या जाणार्या देशात इतर खेळांची रोपे मोठी होणार नाहित. तरीही आता बर्यापैकी स्थिती बदलली आहे आणि इतर खेळाडूही चांगले चमकत आहेत आणि नावलौकिक मिळवत आहेत. परंतु या सर्वांचे प्रणेते मात्र मिल्खा सिंग हेच आहेत, हे विसरता कामा नये.