तब्बल ८५ वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये मल्लखांब सादरीकरणाची संधी
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली : जपानमधील टोक्यो येथे २३ जुलैपासून ऑलिम्पिक स्पर्धेला सुरूवात होणार आहे. यावेळी टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत मल्लखांब या भारतीय क्रीडा प्रकाराला तब्बल ८५ वर्षांनी सादरीकरणाची संधी मिळणार आहे. ऑलिम्पिकच्या समारोप समारंभामध्ये मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत.
३० जुलै आणि १ ऑगस्ट १९३६ या कालावधीत बर्लिन ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान ३० मल्लखांबपटूंनी प्रात्यक्षिके सादर केली होती. डॉ. विश्वनाथ कर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली मल्लखांबपटूंनी प्रात्यक्षिके सादर करून जगभरातील क्रीडापटूंची मने जिंकली होती. यावेळी या संघाचा जर्मनीचे चॅन्सलर अॅडॉल्फ हिटलर यांनी प्रशस्तिपत्रक आणि सुवर्णपदक देऊन गौरव केला होता, अशी माहिती राष्ट्रीय मल्लखांबपटू आणि प्रशिक्षक श्रीनिवास हवालदार यांनी दिली. दरम्यान, भारतीय क्रीडापटूंची पहिली तुकडी काल रविवारी टोक्योत दाखल झाली असून आठ क्रीडाप्रकारांतील ५४ खेळाडू आणि अन्य ३४ कर्मचाऱ्यांचा या तुकडीत समावेश आहे.