कुलभूषण जाधव यांना फाशीविरोधात मागता येणार दाद; पाकिस्तानातील सुधारित कायद्याचा लाभ
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली, : पाकिस्तानी संसदेमध्ये कुलभूषण जाधव यांच्यासंदर्भातील एक महत्वाचं विधेयक संमत केलं आहे. भारताचे माजी नौदल अधिकारी असणाऱ्या कुलभूषण यांना हेरगिरीच्या गुन्हाअंतर्गत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र आता कुलभूषण यांना या शिक्षेविरोधात पाकिस्तान उच्च न्यायालयामध्ये दाद मागता येणार असल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या आधारे कुलभूषण यांना आता पाकिस्तानमध्ये उच्च न्यायालयांमध्ये शिक्षेसंदर्भात फेरविचार याचिका दाखल करता येणार आहे.
पाकिस्तानने केलेल्या दाव्यानुसार कुलभूषण यांना २०१६ साली बलुचिस्तानमधून अटक करण्यात आली होती. हेरगिरीच्या गुन्ह्याखाली त्यांना दोषी ठरवत लष्करी न्यायालयाने २०१७ साली फाशीची शिक्षा सुनावली. भारताने पाकिस्तानचा हा दावा खोडून काढला आहे. कुलभूषण यांचं पाकिस्तानने अपहरण केल्याचा दावा भारताने केलाय. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांनी इराणमधील चाबार बंदरावरुन कुलभूषण यांचं अपहरण केल्याचं भारताचं म्हणणं आहे. कुलभूषण हे इराणमध्ये व्यापारासाठी गेले होते असं भारताने म्हटलंय. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने २०१८ साली कुलभूषण यांच्या फाशीच्या शिक्षेवर स्थगिती आणलीय.
पाकिस्तानमधील कनिष्ठ सभागृहाने नवीन कायदा संमत केला आहे. २१ सदस्यांच्या स्थायी समितीने परवानगी दिल्यानंतर हा कायदा संमत करण्यात आला आहे. या कायद्याला आंतरराष्ट्रीय न्यायालय (पुनरावलोकन आणि पुनर्विचार) कायदा असं नाव देण्यात आलं आहे. हा कायदा संपूर्ण पाकिस्तानमध्ये एकाच वेळी लागू होणार असल्याचं स्पष्ट केरण्यात आलं आहे. यापूर्वी पाकिस्तानच्या संसदेमध्ये कुलभूषण प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर यासंदर्भातील अध्यादेश जारी केला होता. आता त्याचं कायद्यात रुपांतर झालं आहे.