अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा!; आता अॅपच्या माध्यमातून घरबसल्या प्रक्रिया करा
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
अकरावीला प्रवेशासाठी होणारा गोंधळ आणि किचकट प्रक्रिया सोडवण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाकडून एका मोबाईल अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. विद्यार्थी आता POEAM अॅपच्या माध्यमातून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करू शकणार आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे.
करोनाचा धोका आणि महाविद्यालयात होणारी गर्दी टाळण्यासाठी या अॅपचा उपयोग होणार आहे. विद्यार्थ्यांना गुगल प्ले स्टोअर आणि आयओएसवर ही अॅप उपलब्ध होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे.
दरम्यान, अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची पहिली प्रवेश यादी शुक्रवारी जाहीर झाली असून पहिल्या फेरीत १ लाख १७ हजार ८८३ विद्यार्थ्यांना पसंतीक्रमानुसार महाविद्यालय मिळाले आहे. दहावीचा निकाल आणि गुणही वाढले असले तरी मुंबई महानगर परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांतील प्रवेश पात्रता गुणांमध्ये (कट ऑफ) मात्र फारशी वाढ झालेली नाही. अनेक महाविद्यालयांतील पात्रता गुण गेल्यावर्षीपेक्षाही घटल्याचे दिसत आहे.
केंद्रीय प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या एकूण १ लाख ९७ हजार १७१ जागांसाठी १ लाख ९१ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. त्यापैकी १ लाख १७ हजार ८८३ विद्यार्थ्यांची पहिल्या यादीत वर्णी लागली आहे. पहिल्या गुणवत्ता यादीत ४८ हजार ७८८ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे कनिष्ठ महाविद्यालय मिळाले आहे. तर १८ हजार ८०४ विद्यार्थ्यांना दुसऱ्या आणि १२ हजार ७९९ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीक्रमाचे कनिष्ठ महाविद्यालय मिळाले आहे. पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक आहे. दुसऱ्या पसंती क्रमापासून खालील पसंती क्रमाची महाविद्यालये मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश हवा असल्यास विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रक्रीयेद्वारे संबधित वेळापत्रकानुसार प्रवेश निश्चिात करायचा आहे.