ताडोबात व्याघ्र पर्यटनाला चांगले दिवस
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
चंद्रपूर : राज्यातील दुसरी लाट ओसरली असताना आता व्याघ्र पर्यटनाला चांगले दिवस आले आहेत. देशात प्रख्यात असणाऱ्या ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पात मान्सून पर्यटनाला पर्यटकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान, ताडोबाच्या बफर क्षेत्रात मागील पावणे दोन महिन्यात सुमारे १८ हजार पर्यटकांनी हजेरी लावली असल्याची माहिती समोर आली आहे.
ताडोबा व्याघ्रप्रकल्प महाराष्ट्र राज्यातील प्रमुख प्रकल्प असून हे पानझडीचे वन आहे. वाघ - बिबट्याशिवाय या उद्यानात आढळणाऱ्या मगरी आणि गवा हे इथले मुख्य वैशिष्ट्य आहे. ताडोबा हे मुख्यत्वे उष्ण कटिबंधीय जंगल प्रकारांमध्ये येते. येथे राज्यातील सर्वाधिक वाघ आहेतच पण त्याशिवाय रानमांजरी, हरणे, बारहसिंगे, चितळ, गवे, रानडुक्कर, नीलगाय, रानकोंबड्या, ठिपकेवाली हरणे असे प्राणी आहेत. अभयारण्यातील रानगव्यांची संख्या मोठी आहे. साग, बांबू, ऐन, हलई, धावडा, बिबळा, तेंदू, मोहा, खैर अशा विविध प्रकारच्या वृक्षांची या अरण्यात दाटी दिसते. येथे राज्यातील सर्वाधिक वाघ आहेत. पण मागील वर्षी आलेल्या करोना संकटाने व्याघ्र पर्यटनाला मोठा फटका बसला होता. राज्यात करोनाची दुसरी लाट आली असताना सुरक्षिततेचा उपाय म्हणून १५ एप्रिलपासून पुन्हा वन्यजीव पर्यटन बंद करण्यात आले होते. पण जून महिन्याच्या मध्यात सारे काही काही पूर्वपदावर येत असताना तब्बल अडीच महिन्यानंतर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोर झोनचे सहाही दरवाजे ६ दिवसांसाठी नियम आणि अटींसह पर्यटकांसाठी खुले झाले. त्याला पर्यटकांनी चांगला प्रतिसाद दिला.
१ जुलैपासून कोरचे दरवाजे बंद झाले. आता बफरमध्ये दिवसाच्या २ टप्प्यात ठरवून दिलेल्या क्षमतेनुसार पर्यटक गाड्यांना अनुमती दिली गेली आहे. पर्यटकांची अडचण लक्षात घेता ताडोबा व्यवस्थापनाने पर्यटकांसाठी १५ जुलैपासून ताडोबा बफरचे ऑनलाईन बुकिंग सुरु केले. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. २०१९ मध्ये मान्सून पर्यटनाला थंड प्रतिसाद मिळाला होता. तर, मागील वर्षी करोना पार्श्वभूमीवर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन मध्ये मागील दीड महिन्यात सुमारे साडेतीन हजारांहून अधिक पर्यटकांनी जंगल सफारीचा आनंद घेतला होता. यंदा प्रथमच मोठी वाढ व्याघ्र पर्यटनात दिसून आल्याची माहिती सूत्रांनी दिली. जुलै महिन्यात सुमारे २ हजार वाहने बफर क्षेत्रात गेली. तर, ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत सुमारे १ हजार ४०० वाहने गेल्याची माहिती आहे. ताडोबा बफरमध्ये एकूण १४ गेट असून १३ गेट सुरु असून एकमेव गेट बंद आहे. ऑनलाईन बुकिंग व ऑगस्ट महिन्यात पावसाची दडी ही व्याघ्र पर्यटनवाढीसाठी महत्वपूर्ण ठरली आहे. ''विकएंड'' ला पर्यटकांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे. परिणामी करोना काळात बसलेला फटका यंदा भरून निघत आहे.