टीम इंडिया लवकर मुंबईत येण्याची शक्यता
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
इंग्लंडला जाणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू क्वारंटाइनमध्ये राहण्यासाठी १९ किंवा २४ मे रोजी मुंबईत एकत्र येऊ शकतात. भारतीय संघ २ जूनला चार्टर विमानाने इंग्लंडला रवाना होणार आहे. यापूर्वी संघाला क्वारंटाइनमध्ये रहावे लागेल.
१९ मे रोजी हे खेळाडू मुंबईत येऊन दोन आठड्यांसाठी क्वारंटाइन राहतील आणि इंग्लंडला निघतील अशी चर्चा होती, मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने खेळाडूंना २४ मेचाही पर्याय दिला आहे. “दोन तारखांवर चर्चा झाली असून येत्या काही दिवसांत याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल,” अशी माहिती सूत्रांनी दिली.
करोना बाधित झाल्यामुळे इंग्लंडने भारताला लाल यादीमध्ये स्थान दिले आहे, त्यामुळे भारतीय खेळाडू आणि कर्मचार्यांना इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतरही १० दिवस क्वारंटाइनमध्ये रहावे लागेल. या मुक्कामा दरम्यान त्यांच्या करोना चाचण्या देखील केल्या जातील.
क्वारंटाइन कालावधी संपल्यानंतर आणि चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाला चार दिवसांचा सराव करण्याची संधी मिळेल. १८ जूनपासून न्यूझीलंडविरुद्ध भारत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. या सामन्यानंतर हा संघ एका महिन्यापेक्षा जास्त काळ कोणताही सामना न खेळता तिथेच राहील. भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका ४ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
योजनेनुसार संघ दोन चार-दिवसीय आंतर-संघ सामने खेळेल आणि करोना निर्बंधामुळे त्यांना काऊटी संघाबरोबर सराव सामने खेळता येणार नाहीत. आंतर-संघात होणाऱ्या सामन्यांचे ठिकाण लवकरच जाहीर केले जाईल.