जम्मू विमानतळ परिसरात दोन स्फोट, दोन जखमी
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
जम्मू : जम्मूच्या टेक्निकल विमानतळ परिसरात शनिवारी रात्री दोन स्फोट झाले आहेत. या स्फोटांत दोन जण जखमी झाले असून त्यांना सैन्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा परिसर उच्च सुरक्षा अंतर्गत येतो. पाच मिनिटांच्या अंतराने येथे दोन स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. पहिला स्फोट एका इमारतीच्या गच्चीवर झाला तर दुसरा स्फोट जमिनीवर झाला.
शनिवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास हे दोन स्फोट झाले. जम्मू पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार हा कमी तीव्रतेचा स्फोट होता. खबरदारी म्हणून बॉम्ब डिस्पोजल टीम आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर काही मिनिटांतच संपूर्ण परिसर सील करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार या स्फोटाचा आवाज खूप दूर ऐकायला गेल्याचे सांगितले जात आहे.
या ठिकाणी भारतीय हवाई दलाचे स्टेशन मुख्यालय आणि जम्मूचे मुख्य विमानतळही आहे. स्फोटानंतर आजूबाजूच्या परिसरात गोंधळाचे वातावरण पसरले होते. घटनास्थळी हवाई दल, भारतीय सेना आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे अधिकारी दाखल होऊन अधिक तपास सुरू आहे.