निर्बंध पूर्णतः हटवा, नाहीतर कडक लॉकडाउन लावा; आरोग्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांना विनंती
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : करोनाची दुसरी लाट राज्यात ओसरताना दिसत आहे. दररोज आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येतही घट झाली असून, भयावह परिस्थितीनंतर आरोग्य व्यवस्थेवरील ताणही हलका होऊ लागला आहे. मात्र, जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच दुसरी लाट उलटण्याचा आणि तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात लागू करण्यात आलेली जिल्हानिहाय पाच टप्प्यांतील निर्बंध प्रणाली रद्द करून सरसकट निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामुळे सर्वसामान्यांना त्रासाला सामोरं जावं लागत असून, हे निर्बंध हटवण्याची मागणी केली जात आहे. सर्वसामान्यांकडून होत असलेल्या या मागणीकडे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं लक्ष वेधलं आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल (१० जुलै) जालना येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील करोना परिस्थितीबद्दल भाष्य करत असताना सध्या राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांसंदर्भातही भूमिका मांडली. “करोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेले निर्बंध पूर्णतः काढून जनतेला दिलासा द्यावा किंवा कडक लॉकडाऊन करावा, अशी विनंती मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे,”अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राजेश टोपे म्हणाले, “देशात आणि महाराष्ट्रात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव अजूनही आहे. राज्यात पश्चिम महाराष्ट्रात करोनाचा उद्रेक कायम असला, तरी राज्याच्या इतर भागात करोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. मात्र तरीही निर्बंध पूर्णतः शिथिल करण्यात न आल्यामुळे सर्वसामान्य त्रस्त आहे. त्यामुळे एक तर हे निर्बंध पूर्णतः काढून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा किंवा पूर्ण आणि कडक लॉकडाऊन करावे”, अशी विनंती आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली असल्याची माहिती टोपे यांनी दिली.
“राज्यात अजूनही काही जिल्ह्यांमध्ये करोनाची परिस्थिती गंभीर आहे. परिस्थिती चिंताजनक असणाऱ्या त्या भागात निर्बंध जाहीर करावेत. मात्र जिथं परिस्थिती नियंत्रणात आहे, तिथे नागरिकांना उद्योग व्यापारासाठी पूर्ण परवानगी द्यावी”, अशी मागणी राजेश टोपे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चेवेळी ही बाब मान्य केली आहे. यावर अभ्यास करून ते लवकरच आपला निर्णय जाहीर करतील. सध्या राज्यात अनेक ठिकाणी लसींचा तुटवडा जाणवत आहे. यासंबंधी ठरावही सरकारने केला आहे. विधिमंडळात ठराव करून तो केंद्र सरकारला पाठवला असून, लवकरच आपण नवनियुक्त केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट घेणार आहे”, अशी माहिती राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.