काबूल विमानतळाबाहेर चेंगराचेंगरी; ७ अफगाण नागरिकांचा मृत्यू

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

काबूल विमानतळाबाहेर चेंगराचेंगरी; ७ अफगाण नागरिकांचा मृत्यू

अफगाणिस्तानमध्ये तालिबानी सत्तेनंतर आता नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. तालिबानच्या राजवटीत नरकयातना भोगव्या लागतील, या भीतीने अनेक नागरिक देश सोडून पलायन करत आहेत. अशातच देश सोडून जाणाऱ्या नागरिकांची विमानतळावर गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे विमानतळावर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर लोकांची गर्दी झाल्याने तणावपूर्ण स्थिती आहे. अशातच गोंधळ झाला आणि चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत ७ अफगाण नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती ब्रिटीश लष्कराने दिली आहे.

“अफगाणिस्तानमधील स्थिती गंभीर आहे. परिस्थिती सुरक्षितरित्या हातळण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी जे काही आवश्यक आहे ते केलं जात आहे”, असं ब्रिटीश लष्कराने आपल्या निवेदनात सांगितलं आहे. तालिबानच्या राजवटीनंतर पळून जाण्यासाठी विमानतळ केंद्रबिंदू ठरत आहे. त्यामुळे विमानतळावरील स्थिती गंभीर होत चालली आहे. अफगाणिस्तानवरून ८७ भारतीयांना घेऊन वायू सेनेचे एक विशेष विमान आज (रविवार)पहाटे दिल्लीत दाखल झाले. या नागरिकांना काल(शनिवारी) भारतीय वायू सेनेच्या विमानाद्वारे सर्वप्रथम काबूलवरून ताजिकिस्तानची राजधानी दुशांबे येथे नेलं गेलं होते. या पाठोपाठच भारतीय वायू सेनेच्या C-17 या विमानाने देखील काबूलहून १६८ नागरिकांना घेऊन परतलं आहे.

दुसरीकडे, काबूल विमानतळावर सध्या अमेरिकन सैन्य दाखल आहे, त्यांच्याकडू भारताला रोज दोन विमान फेऱ्यांना परवानगी दिली गेली आहे. अमेरिका देखील अफगाणिस्तानमधील आपल्या नागरिकांना काबूलवर विमानतळावरून परत आणत आहे. सध्या काबूल विमानतळावर जवळपास पाच हजाराच्या संख्येने अमेरिकन व नाटो सैन्य दाखल आहे.