अमेरिकेकडून इसिसच्या तळांवर बॉम्ब हल्ले
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
काबुल,: काबुल विमानतळावर गुरुवारी आत्मघातकी हल्ला झाला होता. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने शनिवारी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या तळांवर ड्रोनच्या माध्यमातून बॉम्ब हल्ले केले. हे हल्ले नानगहर प्रांतामध्ये केले आहेत. यात काबुल हल्ल्याच्या मास्टरमाईंडचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गुरुवारी झालेल्या हल्ल्यात ९५ अफगाणी नागरिक आणि १३ अमेरिकी सैनिक ठार झाले होते. त्यावर अमेरिकने राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी काबूलमधील हल्लेखोरांना धडा शिकवू, असा इशारा दिला होता. त्यानंतर ४८ तासांत इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या तळांवर ड्रोनने बॉम्ब हल्ले करण्यात आले. या संदर्भात अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय असलेल्या पेंटागॉनने दिली आहे. दरम्यान पुन्हा एकदा काबुल विमानतळावर हल्ला होण्याची शक्यता अमेरिकेने व्यक्त केली असून त्या अनुषंगाने आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
सुरक्षेच्या कारणास्तव अमेरिकन नागरिकांना विमानतळाच्या वेगवेगळ्या प्रवेशद्वारांपासून तात्काळ दूर होण्यास सांगण्यात आले आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रवक्ते कॅप्टन बिल अर्बन यांनी सांगितले की, अमेरिकन लष्कराने एक आयएसआयएस के प्लॅनर विरोधात दहशतवादी विरोधी मोहीम राबवली आहे.