मोदींविरोधात पवारांचा पॉवरफूल डाव!; भाजपाविरोधी पक्षांची उद्या घेणार बैठक
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशभरात भाजपा विरोधी पक्षांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. २०२४ निवडणुकीपूर्वी शरद पवार विरोधकांना एकत्र आणण्याची रणनिती आखत असल्याचं बोललं जात आहे. निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंगळवारी दुपारी ४ वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. करोना काळात पहिल्यांदाच विरोधक व्हिडिओ कॉन्फरन्सऐवजी एकत्र बैठकीला उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रमंचच्या माध्यमातून १५ पक्षांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय जनता दल नेते तेजस्वी यादव यांनाही या बैठकीचं आमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र या बैठकीचं काँग्रेसला बोलवणं नाही.
राष्ट्र मंचच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पहिल्यांदाच भाग घेणार आहेत. राष्ट्र मंचची पायाभरणी २०१८ साली यशवंत सिन्हा यांनी केली होती. सध्या तरी कोणत्याच राजकीय वाटलीची घोषणा राष्ट्र मंचाकडून करण्यात आलेली नाही. मात्र भविष्यात तिसरी आघाडी स्थापन करण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर ममता बॅनर्जी यांना तिसऱ्या आघाडीचा चेहरा बनवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं बोललं जात आहे. तसेच शरद पवार तिसऱ्या आघाडीच्या संयोजकपदाची भूमिका पार पाडतील असंही सांगण्यात येत आहे.
निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांची एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. पहिल्या बैठकीत जवळपास ४ तास या दोघांमध्ये चर्चा झाली होती. त्यानंतर ११ जूनला पुन्हा एकदा बैठक झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २०२४ च्या निवडणुकीत रोखण्यासाठी रणनिती आखली जात असल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही काँग्रेस महासचिव, राज्य प्रभारी आणि प्रदेशाध्यक्षांची बैठक बोलावली आहे. ही बैठक २४ जूनला आहे.