वांद्रे-कुर्ला संकुल जेव्हीएलआर पूल दुर्घटनेची चौकशी करण्याचे एकनाथ शिंदे यांचे आदेश
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : वांद्रे कुर्ला संकुल ते जेव्हीएलआरला जोडणाऱ्या पुलाचा गर्डर कोसळून झालेल्या दुर्घटनेची त्रयस्थ मूल्यमापन संस्था आणि एमएमआरडीएचे अधिकारी मिळून चौकशी करतील अशी घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच या घटनेत जखमी झालेल्या कामगारांच्या उपचाराचा खर्च एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास वांद्रे कुर्ला संकुल आणि जेव्हीएलआर याना जोडणारा निर्माणाधिन पुलाचा गर्डर अचानक एका बाजूला कलंडल्याने त्यात 14 कामगार जखमी झाले. सुदैवाने या दुघटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.
यावेळी बोलताना त्यांनी 'झालेली ही दुर्घटना पूर्णपणे दुर्दैवी असून या दुर्घटनेला जो कुणी जबाबदार असेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. ही दुर्घटना गर्डरचे बेअरिंग आणि नट बोल्ट यांच्यात त्रुटी राहिल्याने झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले, तरीही त्याची पूर्ण चौकशी करून त्यानंतरच दोषींवर कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच अशी दुर्घटना पुन्हा होऊ नये यासाठी नवीन तयार होत असलेल्या पुलांचे मूल्यमापनही त्रयस्थ मूल्यमापन संस्थेकडून करण्याचे निर्देश श्री. शिंदे यांनी एमएमआरडीए आयुक्तांना दिले.
जखमी कामगाराची रुग्णालयात जाऊन घेलती भेट
या दुर्घटनेत किरकोळ जखमी झालेल्या 13 कामगारांना उपचार करून रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. तर केवळ एका कामगार डॉक्टरांचा निगराणीखाली उपचार घेत होता. मंत्री शिंदे यांनी स्वतः व्ही.एन. देसाई रुग्णालयात जाऊन या कामगाराची विचारपूस केली. तसेच त्याच्यावर नीट उपचार करण्याच्या सूचना डॉक्टराना दिल्या. यावेळी एमएमआरडीए आयुक्त व्ही श्रीनिवास राव, स्थानिक पोलीस अधिकारी, एमएमआरडीएचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार