भाजपासोबत युती होणार का?; चंद्रकांत पाटील भेटीनंतर मनसेकडून पहिली प्रतिक्रिया
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (शुक्रवार) सकाळी साडेअकरा वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट कृष्णकुंज येथे भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. भविष्यात भाजपा व मनेस यांची युती होणार का? हा देखील प्रश्न अनेकांच्या मनात सध्या निर्माण झालेला आहे. तर, मागील २० दिवसांत या दोन्ही नेत्यांची ही दुसरी भेट असल्याने, चर्चा अधिकच रंगल्या आहेत. दरम्यान, यावर मनसेनेते बाळा नांदगावकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बाळा नांदगावकर म्हणाले, “चंद्रकांत पाटील जेव्हा आले आणि गेले तेव्हा ते आनंदात होते. त्यांनी माझ्या कानात देखील काहीतरी सांगितले. ते मी सांगू शकत नाही. पण सगळ सकारात्मक होत. कारण आम्ही नकारत्मक विचार नाही करत. आम्ही एकटे लढत होतो तेव्हाही सकारात्मक होतो आणि आताही आहोत.”
भविष्यात भाजपा-मनसे युती होणार का?
“यापुर्वी उत्तर भारतीयांवरील भाषणाचा काही क्लिप राज ठाकरे यांनी चंद्रकांत पाटलांना पाठवल्या होत्या यावर दोघांमध्ये चर्चा झाली असेल. तो माझा विषय नाही. तो राज ठाकरेंचा विषय आहे”, असे नांदगावकर म्हणाले. भविष्यात भाजपा-मनसे युती होणार का? यावर बाळा नांदगावकर म्हणाले, “राजकारणात काय होईल हे आता सांगू शकत नाही पण राजकारणात कधीही काहीही होते, हे निश्चित आहे”.
भाजप-मनसे युतीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर असेही सांगितले जात आहे की, भाजपा हा राष्ट्रीय पक्ष असून राज्यातील जनतेच्या अधिकारांचे रक्षण व स्वाभिमान जपताना परप्रांतीयांवर अन्यायाची मनसेची भूमिका मात्र भाजपाला मान्य नाही. मनसेने परप्रांतीयांना विरोधाची भूमिका बाजूला ठेवली, तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती होण्याचे शक्यता दिसत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ४ दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत, असे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे. चंद्रकांत पाटील यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपा-मनसे युती होणार का?, याकडे राजकीय वर्तुळात सर्वांचे लक्ष लागले आहे. जवळपास ४० मिनटं चंद्रकांत पाटलांनी राज ठाकचे यांच्यासोबत चर्चा केली.