ममता बॅनर्जी ५ मे रोजी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत अखेर तृणमूल काँग्रेसने बाजी मारली. संपूर्ण ताकदीनिशी निवडणूक रिंगणात उतरून प्रतिष्ठा पणाला लावलेल्या भाजपाचा ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँगेसने अक्षरशा धुव्वा उडवला. अटीतटीचा सामना होण्याचा अंदाज खोटा ठरवत तृणमूलने भाजपाला दोन आकड्यांतच रोखून तिसऱ्यांदा सत्ता मिळवली. त्यानंतर आता ५ मे रोजी ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
तर, सर्व आमदारांची शपथविधी ६ मे रोजी होणार आहे. याप्रसंगी विजयी रॅली काढू नका, असं ममता बॅनर्जींनी आवाहन केलं आहे.
पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, केरळ या राज्यांसह पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुका आणि देशातील पोटनिवडणुकांची मतमोजणी रविवारी झाली. करोना प्रतिबंधक नियमांच्या पार्श्वभूमीवर सकाळपासून संथगतीने मतमोजणी सुरू होती. तब्बल आठ टप्प्यांत मतदान पार पाडलेल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आदींच्या झंझावाती प्रचाराचे केंद्र ठरलेल्या बंगालच्या निकालाबाबत सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. बंगालमध्ये भाजपा तृणमूल काँगे्रसला कडवी लढत देईल, असा अंदाज मतदानोत्तर चाचण्यांनीही वर्तवला होता. मात्र, मतमोजणी सुरू होताच हा अंदाज खोटा ठरवत तृणमूल काँगे्रसने मारलेली मुसंडी अखेरपर्यंत कायम राखली.