घरगुती हिंसाचार प्रकरणी कोर्टाने हनी सिंहला फटकारलं
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
सुप्रसिद्ध पॉप सिंगर यो यो हनी सिंह विरोधात त्याची पत्नी शालिनी तलवार यांनी घरगुती हिंसा आणि इतर हिंसाचाराविरोधात दिल्लीतील तीस हजारी कोर्टात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात त्याच्या पत्नीने 10 कोटी रुपयांची भरपाई देण्याची देखील मागणी केली आहे. या प्रकरणावर आज दिल्लीतील तीस हजारी कोर्टात सुनावणी झाली. मात्र, या सुनावणीला यो यो हनी सिंह अनुपस्थित राहिला. त्यामुळे न्यायालयाने त्याला चांगलंच फटकारलं आहे.
शालिनी तलवार यांनी दाखल केलेल्या घरगुती हिंसाचार प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान हनी सिंहच्या वकिलांनी त्यांची प्रकृती व्यवस्थित नसल्याचं कारण देत तो सुनावणीला अनुपस्थित असल्याचं सांगितलं. त्याचप्रमाणे पुढच्या सुनावणीला तो आवर्जुन हजर राहील, असं आश्वासन देखील हनी सिंहच्या वकिलांनी दिलंय. यावरून न्यायालयाने हनी सिंहला चांगलंच फटकारलंय. यावर न्यायालयाने हनी सिंहचे मेडिकल रिपोर्ट आणि आयटी रिटर्न सादर करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे. त्यामुळे हनी सिंहच्या अडचणीत आणखी वाढ होणार असं चित्र दिसतंय.
सुनावणी दरम्यान हनी सिंगच्या वकिलांनी या प्रकरणी उत्तर दाखल करण्यासाठी काही वेळ मागितला आहे. सुनावणीसाठी हनी सिंहच्या वकिलांनी केलेल्या विनंतीवर बोलताना ‘कोणीही कायद्यापेक्षा वर नाही’ असं देखील न्यायालयाने म्हटलं. यावर हनी सिंहच्या वकिलांनी न्यायालयाला विश्वास दाखवत हनी सिंह लवकरात लवकर न्यायालयात वैद्यकीय अहवाल आणि आयकर विवरणपत्र सादर करेल, असं म्हटलं. या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 सप्टेंबर 2021 रोजी होणार आहे. यो यो हनी सिंहची पत्नी शालिनी तलवार यांनी हनी सिंहच्या विरोधात तीस हजारी न्यायालयाच्या मुख्य महानगर दंडाधिकारी तानिया सिंह यांनी हनी सिंगच्या विरोधात नोटीस जारी केली होती. यात त्याला 28 ऑगस्टपर्यंत पत्नीने लावलेल्या सर्व आरोपांना उत्तर देण्यास बजावले होते. यासह, न्यायालयाने हनी सिंहला एक आदेश देत हनी सिंग त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या मालमत्तेबाबत कोणताही निर्णय घेऊ शकत नाही, असं देखील म्हटलं होतं. हनी सिंहची पत्नी शालिनी यांनी त्याच्यावर अनेक आरोप केले आहेत. गेल्या 10 वर्षांपासून हनी सिंह शालिनी यांना घरात वाईट पद्धतीने वागणूक देत होता. शालिनी सिंग यांनी पती हनी सिंगवर घरगुती हिंसा, लैंगिक हिंसा, मानसिक छळ आणि तिच्यासोबत आर्थिक फसवणुकीचा आरोप केलाय. तसंच हनीने त्यांच्या लग्नाला महत्त्व दिले नाही, त्याने त्यांच्या लग्नाची अंगठीही घातली नाही. एकदा जेव्हा शालिनीने त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले, यानंतरही तो खूप रागावला आणि त्याने शालिनीला खूप मारलं असल्याचं देखील शालिनी यांनी सांगितलं.