ग्रामीण महाआवास अभियानाला मुदतवाढ - हसन मुश्रीफ
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
राज्यातील प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) आणि सर्व राज्य पुरस्कृत आवास योजनांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी तसेच त्यामध्ये गुणवत्ता आणण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या महाआवास अभियानाला (ग्रामीण) येत्या ५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी दिली.
राज्यातील पात्र लाभार्थ्यांना पावसाळ्यापूर्वी गृहप्रवेश करता यावा. घरकुलासोबतच सरकारच्या इतर योजनांचा लाभ देऊन त्यांचे जीवनमान उंचवावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. उर्वरित घरकुलांचे काम गुणवत्तापूर्ण आणि जलदगतीने पूर्ण करण्यात यावे अशा सूचना सर्व जिल्हा परिषदांना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय आवास दिन म्हणजे २० नोव्हेंबर २०२० पासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सुरू झालेल्या आणि १ मे २०२१ पर्यंत राबविण्यात आलेल्या या अभियानाची वाटचाल यशस्वीरित्या सुरू असून या कालावधीत सुमारे ७ लाख ५० हजार घरकुलांची बांधकामे हाती घेण्यात आली. त्यापैकी आतापर्यंत ३ लाख ५० हजार घरकुले पूर्ण झाली असून ३ लाख ९९ हजार घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे, अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली.
९२१ बहुमजली इमारतींची निर्मिती
कोरोनाच्या जागतिक महामारीच्या काळात लाभार्थ्यांना घरकुल बांधकामाचे साहित्य एकाच छताखाली आणि जवळ उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने तालुकास्तरावर घरकुल मार्ट तयार करण्यात आले असून राज्यामध्ये ३७८ घरकुल मार्ट सुरू झाली आहेत. लाभार्थ्यांना आदर्श घरकुलांची ओळख करून देण्यासाठी २४२ डेमो हाउसची निर्मिती केली आहे. अभियानामध्ये नावीन्यपूर्ण उपक्रमांचाही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने घरकुल बांधकामासाठी जागा नसणाऱ्या लाभार्थ्यांकडे विशेष लक्ष देऊन ४३ हजार १९७ लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. पुरेशी जागा नसलेल्या लाभार्थ्यांसाठी बहुमजली इमारती निर्माण करण्यात येत आहेत. आज अखेर ९२१ बहुमजली इमारतींची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच जेथे पुरेशी जागा उपलब्ध आहे अशा ठिकाणी सर्व सोयी-सुविधांनी युक्त असे २१६ गृहसंकुल उभारण्यात आले आहेत, अशी माहिती ग्रामविकास मंत्र्यांनी दिली.